वृत्तसंस्था / बर्लीन :
आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेच्या समजलेल्या जाणाऱया लॉरेस क्रीडा चळवळ 2000-2020 पुरस्कार शर्यतीमध्ये भारताचा माजी कसोटीवीर आणि जागतिक फलंदाज सचिन तेंडुलकरचा समावेश करण्यात आला आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी 20 जणांच्या यादीत सचिनचा समावेश आहे.
2011 साली भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दुसऱयांदा जिंकली होती. तत्पूर्वी म्हणजे कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषकावर 1983 साली आपले नाव कोरले होते. जवळपास 9 वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकण्याचा सहाव्यांदा प्रयत्न केला होता. 2011 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकरने भारताला विश्वचषक मिळवून देण्यासाठी सर्व जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. तत्कालीन संघाचा कर्णधार धोनी आणि त्याच्या साथीदारांनी सचिनचे हे स्वप्न साकार करण्याकरिता प्रयत्नांची शर्थ केली होती. क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी सचिनला त्याच्या घरच्या मैदानावर (मुंबई-वानखेडे स्टेडियमवर) विश्वचषक मिळवून देण्याची धोनीच्या संघाची मोहीम यशस्वी ठरली होती.
भारताला दुसऱयांदा विश्वचषक मिळवून देण्यात सचिनचा वाटा महत्त्वाचा ठरला होता. सचिनच्या डोळय़ातील आनंदाश्रू या क्षणाचे साक्षीदार ठरले होते. आधुनिक क्रिकेट चळवळीमध्ये सचिनची कामगिरी जागतिक स्तरावर महत्त्वाची ठरल्याने लॉरेस क्रीडा चळवळ पुरस्कारासाठी सचिनच्या नांवाची शिफारस अत्यंत योग्य असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने म्हटले आहे. लॉरेस अकादमीचा स्टीव्ह वॉ एक सदस्य आहे. 2002 साली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने लॉरेस क्रीडा सांघिक पुरस्कार मिळविला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा क्षण असल्याची आठवण स्टीव्ह वॉने करून दिली.
लॉरेस अकादमी फौंडेशनतर्फे 2000 पासून या पुरस्कार वितरणाला प्रारंभ झाला. प्रत्येकवर्षी हा पुरस्कार जनतेने दिलेल्या मतदानावरून नियमितपणे दिला जातो. या पुरस्काराचे हे 20 वे वर्ष असून 17 फेब्रुवारीला बर्लीनमध्ये लॉरेस विश्व क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. 10 जानेवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी या फौंडेशनतर्फे इच्छुकांची मत मागविली जाणार आहेत.









