क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
एफसी गोवाचे प्रशिक्षक असताना सर्जिओ लॉबेरा यांनी नेहमीच आयएसएलच्या चषकाने हुलकावणी दिली होती, मात्र मुंबई सिटी एफसीला या मोसमात प्रशिक्षण दिलेल्या स्पेनच्या लॉबेरा यांनी पहिल्या प्रयत्नातच मुंबईकडून जेतेपदाला गवसणी घातली. तीन वर्षे एफसी गोवाचे प्रशिक्षक असताना लॉबेराने जे जमले नाही, ते त्यांनी यंदा मुंबईसाठी पहिल्याच प्रयत्नात केले आणि लीगची शील्ड व चषकही जिंकून दिला. अशी कामगिरी करणारे आयएसएलमधील ते पहिले प्रशिक्षकही बनले.

आक्रमक खेळावर नेहमीच लक्ष केंद्रीत ठेवणाऱया सर्जिओ लोबेरो यांनी यंदाच्या आयएसएल मोसमात एटीके मोहन बागानला केवळ अंतिम सामन्यातच नव्हे, तर लीगमधील दोन्ही टप्प्यात पराभूत केले. संघाचे जेतेपद हे मुंबई सिटी एफसीच्या पाठिराख्यांना तसेच संघ व्यवस्थापनाला समर्पित असल्याचे लॉबेरा म्हणाले. माझ्या खेळाडूंनी एक गोलाच्या पिछाडीवरून दाखविलेली जिगरबाज खेळी अजिंक्यपद मिळवून देण्यास कारणीभूत ठरली, असे ते म्हणाले.
एफसी गोवाचे प्रशिक्षक असताना मिळविलेल्या सुपर कपचे जेतेपद तसेच यंदाच्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील लीग शील्ड आणि आयएसएल चषक हे सर्व जेतेपदाचे चषक आपल्यासाठी तेवढेच मोलाचे असल्याचे ते म्हणाले. यंदाच्या लीगमधील मिळविलेली शील्ड आम्हाला आमच्या पुढील ध्येय गाठण्यासाठी मोलाची ठरली असे लॉबेरा म्हणाले.
भारतीय फुटबॉलला आता चांगले दिवस येणार आहेत. आयएसएलचे आयोजन हे एक येथील फुटबॉलचा आलेख आणि दर्जा उंचावण्यासाठी असलेले योग्य व्यासपीठ असल्याचे सांगून यंदाच्या आयएसएलमध्ये भारतीय फुटबॉलपटूंनी निश्चितच छाप पाडल्याचे ते म्हणाले. आपल्या संघातील अमेय रानावडे आणि बिपीन सिंगचे त्यांनी कौतुक पेले.









