महात्मा फुले रोडवरील घटना, आरोपी फरारी : पोलीस तपास सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्यावषी गुन्हेगारी कारवायांनी धुडगूस घातलेल्या टोळीतील काही गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले आहेत. खोली दिली नाही म्हणून लॉज व्यवस्थापकावर चाकूहल्ला करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री महात्मा फुले रोडवर ही घटना घडली.
जतीन श्रीकांत होसुरकर (वय 28, रा. कोरे गल्ली-शहापूर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. विनायक उर्फ गिड्डू बोंगाळे याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. गिड्डूवर शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
जखमी जतीन हा महात्मा फुले रोडवरील ब्ल्यु रे हॉटेलचा व्यवस्थापक आहे. रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी रात्री गिड्डू आपल्या एका मित्रासमवेत लॉजमध्ये गेला. काऊंटरवर असलेल्या ओंकार रमेश चौगुले याला गाठून खोली देण्याची मागणी केली. त्यावेळी तेथेच असलेले क्यवस्थापक जतीन यांनी लॉज फुल्ल आहे, खोली नाही, असे सांगितले. खोली नसल्याचे सांगितल्यामुळे रागाने बाहेर पडलेला गिड्डू 15 मिनिटांनी मध्यरात्री 12 वाजता पुन्हा हॉटेलजवळ आला. हॉटेलजवळ थांबलेल्या जतीनला शिवीगाळ करीत मला का खोली दिला नाहीस, अशी विचारणा केली व त्याच्यावर चाकूने हल्ला केला. शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत. गिड्डूवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.









