सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
माळमारूती स्पोर्ट्स क्लब आयोजित सिगन चषक निमंत्रितांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून लॉगर संघाने एमसीसी संघाचा 83 धावानी तर अर्जुन स्पोर्ट्स संघाने एसकेएस संकेश्वर संघाचा 3 गडय़ानी पराभव केला. झेवियर गोम्स (लॉगर), प्रणय शेट्टी (अर्जुन स्पोर्ट्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लॉगर संघाने 20 षटकात 8 बाद 188 धावा केल्या. त्यात झेवियर गोम्सने 6 षटकार, 5 चौकारासह 62, निलेश पाटीलने 12 चौकारासह 59 तर सलमान गोकाककरने 24 धावा केल्या. एमसीसीतर्फे सुनील लमानीने 44 धावात 3, सुगत राजूने 49 धावात 2 तर हर्षने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसी मच्छे संघाचा डाव 105 धावात आटोपला. त्यात गौस हाजीने 4 चौकारासह 25 तर मलिक मुल्लाने 4 चौकारासह 27 धावा केल्या. लॉगरतर्फे दर्शन व्ही. ने 3, इम्रानखान व आस्लम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात एसकेई संकेश्वर संघाने 17.1 षटकात सर्व बाद 107 धावा केल्या. त्यात राजु करोशीने 9 चौकारासह 55 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे रोहित देसाईने 11 धावात 4 तर हार्दिक काटेने 19 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स संघाने 16.2 षटकात 7 बाद 111 धावा करून सामना 3 गडय़ानी जिंकला. त्यात प्रणय शेट्टीने 1 षटकार, 7 चौकारासह 53 तर रोहित देसाईने 3 चौकारासह 15 धावा केल्या. संकेश्वरतर्फे जोतिबा पाटीलने 20 धावात 3 तर राजू सावंतने 16 धावात 2 गडी बाद केले.









