ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला असून पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मद्य विक्रीची दुकाने सुरु राहणार असल्याने सामाजिक व कौटुंबिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये दारुच्या दुकानांना मुभा देणे चुकीचे आहे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले.
सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत मद्य विक्रीची दुकाने उघडी ठेवण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आली असल्याचे वृत्त समजताच नागरिकांनी रस्त्यावर मोठया प्रमाणात गर्दी केली. मद्य खरेदीसाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या असून कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अशी गर्दी होणे चुकीचे आहे. यापेक्षा वाहन दुरुस्ती व इतर आवश्यक सेवांची दुकाने उघडण्यास परवानगी देणे गरजेचे आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, दारुची दुकाने सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे देखील उल्लंघन सुरु झाले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासन, पोलिस, डॉक्टर्स, स्वयंसेवी संस्था यांनी आजपर्यंत अपार मेहनत केली, जोखीम उचलली. या सगळ्यांचेच खच्चीकरण होईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.