ऑनलाइन टीम / मुंबई :
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. इतर देशातील चित्र भारतापेक्षा भयानक आहे. मात्र आपण अशीच काळजी घेतली तर नक्कीच कोरोनावर मात करू असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी फेसबुक द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, आरोग्य विभागाचे कर्मचारी रुग्णांची व्यवस्थित काळजी घेत आहेत. आपण सर्वांनी देखील लॉक डाऊनच्या शेवटच्या टप्प्यात अधिक काळजी घेतली पाहिजे.
तसेच दिल्लीमध्ये निजामुद्दीन येथे पार पडलेला तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती असेही पवार यांनी यावेळी म्हटले. पुढे ते म्हणाले, वारंवार टीव्हीवर या बातम्या दाखवल्याने सांप्रदायिक कलह वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.
याचबरोबर सोशल मीडियावर येणारे मेसेज हे काळजी वाढवणारे आहेत. या खोट्या मेसेज मुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. त्यामुळे असल्या मेसेजवर विश्वास न ठेवता सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन पुन्हा एकदा पवार यांनी यावेळी जनतेला केले.









