आज सकारात्मक निर्णय शक्य : आक्रमक व्यापारी संघटनांची सावध भूमिका
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य शासनाच्या नियमानुसार अद्यापही कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. राज्य शासनाने पाच दिवसांपासून प्रायोगीक अनलॉक केले होते. त्याची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर पुन्हा चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र सोमवार पासून पुन्हा दुकाने सुरु होणार की नाही याबाबत राज्य शासनाकडून शनिवारी रात्री पर्यंत कोणतेच आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले नाहीत. यामुळे व्यापारी सध्या राज्यशासनाच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत. एरव्ही आक्रमक भूमिकेची भाषा करणाऱ्या व्यापारी संघटनांनी यावेळी मात्रा सकारात्मक आदेश येईल, अशी प्रतिक्रिया देत सावध भूमिका घेतली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यामुळे तीन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार बंद होते. यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी 5 जुलै पासून दुकाने सुरु करण्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासन व व्यापाऱयांमध्ये संघर्षाची होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र 4 जुलै रविवार रात्री उशिरा राज्य शासनाने 5 ते 9 जुलै दरम्यान प्रायोगिक तत्वावर सर्व आस्थापने सुरु करण्यास परवानगी दिली होती. याची मुदत शुक्रवारी सायंकाळी संपली. शुक्रवारी सायंकाळ नंतर जिल्ह्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले.
आमदार जाधव, प्र. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांची भेट
दरम्यान, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेसह विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी आमदार चंद्रकांत जाधव यांची भेट घेतली. यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेवून मागील प्रमाणे परवानगी देण्याची विनंती केली. याबाबत शासनास पॉझिटीव्हीटी रेटचा अहवाल पाठविण्यात आला असून राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागेल, असे डॉ. बलकवडे यांनी सांगितले. शनिवारी रात्री उशिरा पर्यंत शासनाकडून कोणताचा आदेश प्राप्त झाला नसल्याने व्यापारी संघटना अद्याप वेटींवगर आहेत.
व्यापारी संघटनांची सावध भूमिका, आदेशाची प्रतीक्षा
दरम्यान, याआधी आक्रमक भूमिका घेत दुकाने उघडण्याचा इशारा देणाऱ्या कोल्हापूर चेंबरसह व्यापारी संघटनांनी यावेळी मात्र सावध भूमिका घेतली आहे. गेल्या रविवारी राज्य शासनाने सर्व दुकाने उघडण्यास प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली होती. त्यामुळे आता संयमी, सावध भूमिका घेत कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी राज्य शासनाच्या सकारात्मक आदेशाची प्रतीक्षा आहे, अशी प्रतिक्रिया देत रविवारी भूमिका जाहीर करू, असे म्हटले आहे.
कोल्हापूर चेंबरकडून जिल्हा प्रशासनाशी संवाद
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सकडून जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संवाद ठेवला जात आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह इतर व्यापारी, व्यावसायिकांची संख्या, माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील पॉझिटीव्हीटीचा रेटही 10 टक्क्यांच्या आत असल्याचे प्रशासनाला सांगितले आहे. त्यामुळे दुकाने सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे. आदेशाची प्रतीक्षा आहे, अशी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या सूत्रांनी दिली.