औषध दुकाने मात्र राहणार सुरू : व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत यांची माहिती
वार्ताहर / कणकवली:
लॉकडाऊनमुळे कणकवलीचा आठवडा बाजार रद्द असतानाही शहरात मंगळवारची होणारी गर्दी रोखण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत या वाराला अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने वगळून किराणा, बेकरी, हॉटेल, भाजी, फळ विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यापारी संघाचे कणकवली तालुकाध्यक्ष विशाल कामत यांनी दिली. सर्व दुकाने बंद असली, तरी भाजी, किराणाची होम डिलिव्हरी सुरू असणार असल्याचे सांगण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी व न. पं. सोबत चर्चा केल्यानंतर हा एकत्रित निर्णय घेण्यात आल्याचे कामत यांनी सांगितले.
21 एप्रिल रोजी कणकवली बाजारपेठेत झालेली गर्दी रोखण्यासाठी डीवायएसपींनाच रस्त्यावर उतरावे लागले होते. नागरिकांनी गर्दी केल्यानंतर सोशल डिस्टंन्सिंग न पाळताच दुकानांमध्ये गर्दी केल्याचे चित्र होते. यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यामुळे याबाबत बुधवारी डीवायएसपी डॉ. कटेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, कोळी, न. पं.चे किशोर धुमाळे, मनोज धुमाळे व कामत यांच्यात याबाबत चर्चा करून वरील निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाची अंमलबजावणी न. पं.मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कटेकर यांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी कणकवलीतील सर्व व्यापारी -विक्रेत्यांनी करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कामत यांनी केले आहे.









