प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरच दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असे माध्यमिक शिक्षण खात्याच्यावतीने कळविण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतची प्रतीक्षा आणखी काही दिवस करावी लागणार आहे. याआधी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी राहणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र शनिवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 एप्रिलपर्यंत वाढविल्याची घोषणा केली आहे.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालल्याने विषाणूचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने लॉकडाऊनचा कालावधी पुढील दोन आठवडय़ांकरिता वाढविण्यात आला आहे. यामुळे लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसांनंतर दहावी परीक्षेबाबतचे वेळापत्रक घोषित करण्यात येणार आहे. याबरोबरच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची तयारी करण्याच्यादृष्टीने आठवडाभर शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.









