मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे आवाहन : शिवनाथ देवस्थानच्या अग्रशाळेचा शिलान्यास
प्रतिनिधी / शिरोडा
राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग झपाटय़ाने वाढत असला तरी, सद्यस्थितीत लॉकडाऊन शक्य नाही. जनतेनेच खबरदारी घेऊन कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे. पंचेचाळीस वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने कोरोनाची लस घ्यावी. ज्यामुळे वाढत्या संसर्गावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शिरोडा येथील श्री शिवनाथ संस्थानच्या अग्रशाळा विस्ताराच्या शिलान्यास सोहळय़ात ते बोलत होते.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर काल मंगळवारी दुपारी हा शिलान्यास सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, सरपंच अमित शिरोडकर, स्थानिक पंचसदस्य शिवानंद नाईक, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिवनाथ देवस्थानचे अध्यक्ष म्हाडू प्रभूगावकर, अग्रशाळा बांधकाम समितीचे अध्यक्ष जयंत मिरींगकर, डॉ. शिरीष बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते भूमीपूजन व शिलान्यासचे अनावरण करून अग्रशाळेच्या वास्तूची पायाभरणी करण्यात आली.
सध्या देशभर कोरोना टीका उत्सव म्हणजे लसीकरण मोहीम सुरु असून गोव्यातही प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात हा कार्यक्रम राबविला जात आहे. गोव्यातील प्रत्येक नागरिकांने या लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोनामुळे गेले वर्षभर आक्रसलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोंय या योजनेकडे सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यातील युवा व तरुण वर्गाने कृषी व अन्य व्यावसाय माध्यमातून स्वतः आत्मनिर्भर होऊन राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावावा, असेही त्यांनी सांगितले.
विनावापर इमारती वापरात आणणार
राज्यात अनेक सरकारी इमारती वापराविना पडून आहेत, तर दुसरीकडे बरीच सरकारी कार्यालये भाडय़ाच्या जागेत भरत आहेत. भाडय़ापोटी सरकारला दर महिन्याला काही कोटी रुपये फेडावे लागतात. या पैशांची बचत करण्यासाठी विनावापर इमारतींचे नूतनीकरण करून भाडय़ाच्या जागेत भरणाऱया कार्यालये स्तलांतरीत करण्याचा विचार आहे. शिवाय विनावापर इमारतींच्या माध्यमातून महसूल निर्मितीचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले.
आमदार सुभाष शिरोडकर म्हणाले, शिरोडा मतदारसंघातील प्रमुख मंदिरांचे सुशोभिकरण करून पर्यटनीयदृष्टय़ा त्यांचा विकास साधला जाईल. तसा प्रस्ताव पर्यटन खात्याकडे मांडणार असून येत्या सहा महिन्यात शिरोडा मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सरपंच अमित शिरोडकर व अन्य मान्यवरांची यावेळी भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक जयंत मिरींगकर यांनी केले. पंचसदस्य पल्लवी शिरोडकर यांनी सूत्रसंचालन तर अंबिका संदीप प्रभूगावकर यांनी आभार मानले.









