बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा जनतेने कोविड कर्फ्यू आणि निर्बंधांचे पालन न केल्यास “लॉकडाऊन लावणे अपरिहार्य ठरेल” असे त्यांनी शुक्रवारी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज मंत्र्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान राज्यात १० मे पासून लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. अद्याप घोषणा झालेली नसून १४ ते १५ दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे.
सरकारने आधीच लॉकडाऊन सारखे नियम लादले आहेत. राज्यात २७ एप्रिल रोजी क्लोजडाऊन सुरु झाला आहे. १२ मे पर्यंत हा क्लोजडाऊन असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की “आम्ही आज आणि उद्या अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करीत आहोत. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, ” असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री लक्ष्मण सावदी, महसूल मंत्री आर. अशोक, वन व कन्नड आणि संस्कृती मंत्री अरविंद लिंबावळी आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री के. सुधाकर आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच यासर्व मंत्र्यांना कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी वेगवेगळी कामे देण्यात आली आहेत.
सरकारमधील अनेक मंत्री आणि केंद्रीय रसायन व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनीही गुरुवारी संपूर्ण लॉकडाऊन लावण्यासंदर्भात आपण सकारात्मक असल्याचे सांगितले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनची गरज असल्याचे म्हंटले आहे.
मंत्री सुधाकर यांनीही शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, राज्यात अनेक प्रकरणे दाखल आहेत, यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्याची जोरदार मागणी होत आहे. तसेच तांत्रिक सल्लागार समितीनेही वाढती प्रकरणे कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. विरोधी पक्ष कॉंग्रेसने राज्यातील कोविड रूग्णांच्या वाढत्या संख्येला आणि रुग्णांच्या मृत्यूला सरकारच्या हलगर्जीपणाला दोष दिला आहे.