मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा- पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर सर्व पालकमंत्र्यांची घेतली बैठक
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने यावर नियंत्रण आणण्यासाठी सोमवारपासून राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हय़ात सदर लॉकडाऊन यशस्वी करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले. राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आलेल्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्व जिल्हा पालकमंत्र्यांची त्यांनी बैठक घेतली.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणे आवश्यक आहे. संपूर्ण लॉकडाऊन जारी करणे हा शेवटचा पर्याय आहे. सोमवारपासून 14 दिवस जारी केलेल्या लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी. यावेळेस दुर्लक्ष केल्यास परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. लॉकडाऊनदरम्यान, जिल्हय़ात कठोर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा पालकमंत्र्यांची आहे, असेही मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले.









