कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदींची राज्यांना महत्वपूर्ण सूचना, घेतला परिस्थितीचा आढावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी, लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लादले न जाता लोकांच्या उपजिविकेचा आणि अर्थव्यवस्थेचा विचार केला जावा, अशी महत्वाची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केली आहे. गुरुवारी त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यासह कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली.
या बैठकीला बहुतेक सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोनाचे आव्हान परतविण्यासाठी किती सज्जता राज्यांनी ठेवली आहे, याची माहिती घेतली. औषधे, ऑक्सिजन, आयसीयु बेड्स्, ऑक्सिजन बेड्स् व इतर पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेची माहितीही त्यांनी घेतली.
ओमिक्रॉनचे प्रमाण अधिक
कोरोनाच्या नव्या उद्रेकात ओमिक्रॉन या नव्या विषाणूरुपाने बाधित असलेल्यांची संख्या जास्त आहे. हा विषाणू इतर कोरोना विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याने अधिक दक्षता घेतली जावी. कोणत्याही परिस्थितीत ढिलाई करु नये. सर्वांनी कोरोनाचे नियम कसोशीने पाळले पाहिजेत. मास्क आणि आणि सॅनिटायझर यांचा सातत्याने उपयोग करणे आवश्यक आहे. राज्य सरकारांनी यासंबंधी जनतेला जागृत करावे. आव्हान मोठे असले तरी घाबरण्याची किंवा निराश होण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आपल्याला केवळ सतर्क रहावे लागेल. कोरोनाच्या या नव्या रुपाचा अभ्यास आपले तज्ञ करीत असून हळूहळू त्यासंबंधीची नेमकी माहिती समोर येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
लसीकरण हे सर्वात मोठे शस्त्र
कोरोनाविरोधात संघर्ष करण्यासाठी सध्या आपल्या हाती लसीकरणाचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. लसीकरणाचा वेग आणखी वाढणे आवश्यक आहे. आतापर्यंत 92 टक्के प्रौढांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. तर 70 टक्के प्रौढांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला असून आपण पूर्वीपेक्षा अधिक सज्ज आहोत, अशी भलावणही त्यांनी केली.
राज्यांकडूनही सूचना
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या बैठकीत अनेक सूचना केल्या. तसेच काही मागण्याही केल्या. प्रत्येक मुख्यमंत्र्याने त्याच्या राज्यातील सज्जता आणि आरोग्य सेवांची उपलब्धता यासंबंधी विवेचन केले, असे नंतर स्पष्ट करण्यात आले.
विजयी होऊच !
कोरोनाविरुद्धच्या या संग्रामात आपण निश्चितपणे विजयी होणार आहोत. मात्र प्रत्येकाने सजगता दाखविण्याची आणि नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. भारताच्या 130 कोटी जनतेच्या संघटित प्रयत्नांसमोर कोरोनाची मात्रा चालणार नाही. देशाजवळ आज पुरेशा प्रमाणात लस आहे. आपली आरोग्य सेवा अधिक बळकट झाली आहे. कोरोनाच्या लसीचा प्रिकॉशन डोस घेतल्याने आपली रोगप्रतिकार क्षमता अधिकच वाढणार आहे. किशोरवयीनांच्या लसीकरणानेही चांगलाच वेग घेतला असून अवघ्या एका आठवडय़ात दोन कोटींहून अधिकांनी लस घेतली आहे. केवळ ओमिक्रॉनच नव्हे, तर भविष्यात येणाऱया कोणत्याही कोरोना रुपाला परतविण्यासाठी आपल्याला सज्ज रहावे लागणार आहे. त्याची सज्जता ठेवावयास हवी, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.
आढावा आणि चर्चा
- प्रत्येक राज्यातील आरोग्य सेवा स्थिती आणि कोरोनाचा प्रसार यावर चर्चा
- कोरोनाचा उदेक अधिक असणाऱया राज्यांनी अधिक दक्षता घेण्याची सूचना
- हा संघर्ष अशक्य नाही, मात्र प्रत्येकाने नियम पाळण्याची आवश्यकता व्यक्त









