प्रतिनिधी / कोल्हापूर
`माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम पुन्हा एकदा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्नसंघटनांतर्फे राबविली जाणार आहे. तोंडाला मास्क नाही तर दुकानात प्रवेश नाही, दुकानात योग्य सामाजीक अंतर राखावे व ग्राहक आणि कर्मचाऱयांना सॅनिटाईज करावे. या त्रिसुत्रीकरणाचा अवलंब करण्याचा निर्णय कोल्हापूर चेंबरच्या बैठकीत घेण्यात आला.
कोरोना या संसर्गजन्य रोगाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यासंदर्भात, पालकमंत्री, सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात, जिह्यातील औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱयांची .बैठक नुकतीच झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची उपस्थिती होती.
या बैठकीमधील सुचना व मार्गदर्शनाबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन टाळण्यासाठी या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन सर्वाना करण्यात आले.
यावेळी शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, हरिभाई पटेल तसेच माजी अध्यक्ष प्रदिपभाई कापडिया यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या सुचना ही केल्या.









