प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना रुग्णांवर औषधोपचार, रुग्णालयाची बिले, रुग्णवाहिकांसह इतर खर्च लाखो रुपयांच्या घरात जात आहे. इतकी रक्कम कोणीही घरी ठेवत नाही किंवा सोबत घेऊन फिरु शकत नाही. त्यामुळे या आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनमध्ये दररोज किमान दोन ते तीन तास जिह्यातील बँका सुरु ठेवण्यास परवानी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे यांनी सोमवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हयात 15 ते 23 मे या कालावधित कडक लॉकडाऊन केला आहे. या कालावधित आरोग्यसेवा, दुध, औषधे आदि व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. या निर्णयाचे स्वागत करुन त्याला पक्षाने पाठींबा दिला आहे. परंतु बँका बंद असल्याने कोरोनाचे उपचार घेणार्या रुग्णांच्या औषधोपचारासह रुग्णालयाची बिले, रुग्णवाहिकांसह इतर बिले भागविताना पैसे उपलब्ध करताना नातेवाईकांना अडचणी येत आहेत.
हा खर्च लाखाच्या घरात असल्याने इतकी रक्कम कोरी घरी ठेवत नाही, तसेच इतकी रक्कम कोणी सोबत घेऊन फिरत नाही, त्याचबरोबर एकमेकांकडून इतकी मोठी रक्कम हस्तांतरीत करणे कठीण आहे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये पैसे भरल्याशिवाय उपचारही सुरु होत नाहीत. त्यासाठी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत व सहकारी बँका दररोज किमान तीन तास सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी.









