तीन दिवसांत चिकणमातीतून साकारली मोदींची प्रतिकृती, पंतप्रधान कार्यालयात सुपूर्द करण्याचा मनोदय
वार्ताहर / सावईवेरे
मन की बात, परीक्षा पे चर्चा करीत लहान मोठय़ांशी वेळोवेळी संवाद साधणारे देशाचे पंतप्रधान नरेंद मोदींनी शालेय विद्यार्थ्यांनाही भुरळ घातलेली आहे. लॉकडाऊन काळात कोरोनाच्या संचारबंदी आटोक्यात आणण्य़ासाठी धडपडणाऱया प्रंटलाईन मोदींना आपल्या कलेच्या माध्यामातून अशाच एका विद्यार्थ्याने सलाम ठोकला आहे. लॉकडाऊन काळात घरात अडकलेल्या नागेशी-बांदोडा येथील एका विद्यार्थ्याने चिकणमातीतून पंतप्रधान मोदी यांची प्रकृती अवघ्या तीन दिवसांत बनवून त्यांना मानवंदना दिली आहे. कु. नंदन नित्यानंद नागेशकर असे त्याचे नाव आहे. त्यांनी बनविलेली प्रतिकृती पीएमओ कार्यालयात सुपूर्द करण्याचा मनोदयही व्यक्त केला आहे.
आपल्या अंगभूत कलागुणांना चालना देण्याचा प्रयत्न करीत लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याची चांगली शिकवण दिली आहे. नंदन कवळेच्या श्री सरस्वती हायस्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. संचारबंदीच्या काळात घरबसल्या आपला वेळ घालविण्यासाठी लहान थोरांना नानाप्रकारच्या क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. शालेय मुलांनी तर घरीच बैठे खेळ खेळण्याचा किंवा मोबाईल टीव्ही बघण्यात आपला वेळ घालविला असेल परंतु काही मुलांनी लॉकडाऊनच्या कालावधीत त्याने आपल्या अंगभूत कलेला जागृत ठेवण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे.

पंतप्रधान मोदींची प्रतिकृती आकर्षक
नंदन यांनी चिकणमातीपासून अनेक ऐतिहासिक, पौराणिक काळातील माणसांच्या प्रतिकृती पुतळे बनविले आहेत. वडील नित्यानंद नागेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज असे अनेक पुतळे तयार केले आहे. या सगळया पुतळयापैकी त्याने बनविलेली पंतप्रधान नरेंद मोदीची प्रतिकृती खरोखरोच आकर्षक ठरली आहे. कारोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व आपली जनता सहीसलामत रहावी म्हणून अगदी वेळ न दवडता संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्यात यशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतवासियांचे हिरो ठरले, त्यामुळे त्याने त्यांचा पुतळा केवळ तीन दिवसांत तयार करून पंतप्रधान मोदीसाठी आपला आदर व्यक्त केला आहे. पीएमओ कार्यालयात गिफ्ट करण्याचेही त्याने ठरविले आहे.
चित्रकला, हस्तकलेतही प्राविण्य
नंदन याचा चिकणमातीच्या कलेत हातखंडा असून एक उत्कृष्ट कलाकार म्हणून त्याची परिसरात ख्याती आहे. चित्रकला व हस्तकलेत त्याने अनेक बक्षिसेही प्राप्त केली आहेत. लॉकडाऊनच्या काळातही आपल्या कलेला जिवंत ठेवल्याबद्दल नंदनचे या परिसरात कौतुक होत आहे.









