शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांची मागणी : मजुरांच्या वावरामुळे संसर्गाचा धोका!
वार्ताहर / कणकवली:
कणकवली तालुक्यातील नरडवे धरणाचे काम लॉकडाऊन कालावधीतही बुधवारपासून सुरू करण्यात आले. त्यामुळे याबाबत संबंधितांना सूचना देत हे काम बंद ठेवण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱयांनी महामार्गापासून ते रस्ते, पूल आदी कामे नियमांचे पालन करत सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर पुन्हा ही कामे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, नरडवे धरणाच्या ठेकेदाराकडून जिल्हाधिकाऱयांचे आदेश धुडकावून काम सुरू करण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केला.
देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक विकासकामे रखडली. यात जिल्हय़ातील विकासकामांना या निर्णयाचा फटका बसला. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची गरज असल्याने जिल्हय़ात बहुसंख्य कामे बंद ठेवत ठेकेदार व प्रशासनाने शासन नियमांचे पालन केले. तरीही बुधवारी नरडवे धरणाचे काम लॉकडाऊन आदेशाचा भंग करत सुरू केले आहे. या धरणाच्या ठिकाणी काम करणारे मजूर हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे या मजुरांच्या राजरोस वावरण्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याबाबत पोलीस व तहसीलदारांना कल्पना देण्यात आली असून हे काम तातडीने बंद करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.









