लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबाबत निर्णय होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देशभरात जारी केलेल्या लॉकडाऊनच्या (टाळेबंदी) पुढील अंमलबजावणीबाबत वरिष्ठ पातळीवर विचारविनियम सुरू आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली. यापूर्वी गुरुवारी शहा यांनी सर्व राज्यांमधील मुख्यमंत्र्यांबरोबर लॉकडाऊन वाढविण्याबाबत मत घेतले होते. मुख्यमंत्र्यांचे धोरण आणि केंद्राची भूमिका याबाबत मोदी आणि शहा यांच्यात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपणार आहे. याचा कालावधी वाढविण्याबाबत गृहमंत्री अमित शहांनी गुरुवारी सर्व राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचे मत जाणून घेतले. यापूर्वी लॉकडाऊनचा कालावधी संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांमधील मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत होते. मात्र आता लॉकडाऊनच्या पुढील निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून भूमिका स्पष्ट करतील, असे मानले जात आहे.









