कोल्हापूरहून लॉकडाऊन तोडत आला : दगडवाहू ट्रकाचा घेतला आधार : पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी / मडगाव
गेले चार महिने गोवा पोलिसांना हुलकावणी देणारा अट्टल गुन्हेगार गेबी फर्नांडिस याला काल रविवारी पहाटे कुडचडे पोलिसांनी अटक केली. लॉकडाऊन तोडत गेबी कोल्हापूरहून थेट गोव्यात आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याची कोविड-19ची चाचणी करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. गेबी कोल्हापूर येथे आसरा घेऊन होता. सद्या लॉकडाऊन असताना व सर्व सीमा सील केल्या असतानाही तो गोव्यात पोचल्याने पोलीस आश्चर्यचकीत झाले आहेत.
गेबी नेमका गोव्यात आला कसा याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरवात केली असता तो ‘रोबर स्टोन’ घेऊन येणाऱया ट्रकातून गोव्यात आल्याचे उघड झाले. मोले येथे उतरल्यानंतर तो जंगलातून सावर्डे येथे आपल्या घरी गेला. या अट्टल गुन्हेगाराला डिसेंबर महिन्यात कुंकळळी पोलिसांनी एका चोरी प्रकरणात अटक केली होती. त्याची प्रकृती खराब झाल्याने त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांना गुंगारा देऊन तो पळून गेला होता.
इस्पितळातून पळून गेल्यानंतर त्याने कोल्हापूरात आश्रय घेतला होता. गेबी आपल्या वृद्ध आईला भेटण्यासाठी घरी आल्याची माहिती कुडचडे पोलिसांना मिळाल्यानतंर पहाटे 5 वाजता त्याच्या घराला वेढा घालून कुडचडे पोलिसांनी त्याला अटक केली. यात पोलीस निरीक्षक रवी देसाई व त्याच्या टीमने महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
गोव्यातून फरार झाल्यानंतर गेबी कोल्हापूरात गेल्याची माहिती पोलिंसांना मिळाली होती. मात्र, सद्या लॉकडाऊन असल्याने पोलीसही आपल्या कामात व्यस्त होते. त्यात तो शनिवारी गोव्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली व तो कुळे येथे येणार असल्याचे संकेत मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, तो दुसऱयाच वाटेने आपल्या सावर्डे येथील घरी गेला. कुडचडे पोलिसांनी शनिवारी रात्री त्याच्या घरावर छापा मारण्याचा प्रयत्न केला. पण, गेबीने रात्र जवळच्या डोंगरावर काढल्याने तो सापडू शकला नाही. शेवटी काल रविवारी पहाटे तो आपल्या घरी परतला असता पोलिसांच्या हाती लागला. नंतर त्याला फातोर्डा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
फातोर्डा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ‘कोविड-19’ साठीची चाचणी केली. सरळ न्यायालयीन कोठडीत पाठवून देण्यात आल्याची माहिती निरीक्षक कपील नायक यांनी दिली. त्याच्या विरूद्ध लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकाऱयांचा आदेश मोडल्यावरून 188 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून तसेच कोल्हापूरातून गोव्यात येताना वैद्यकीय तपासणी न केल्याने तसेच तो कोरोना सक्रमित असू शकतो म्हणून 269 कलमाखाली आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गांवस यांनी अट्टल गुन्हेगार गेबी फर्नांडिसला अटक केल्याने कुडचडे पोलिसांचे अभिनंदन केले आहे.









