ऑनलाईन टीम / तरुण भारत
सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक सोशल मीडिया माध्यमांचा उपयोग करून बरेच जण एकाच वेळी एके ठिकाणी लाईव्ह येत आहेत. अनेक वेगवेगळ्या अॅपचा चांगला उपयोग करून घरच्या घरी बारसे, किंवा इतर छोटे कार्यक्रम केले जात आहे. अशातच कल्याणच्या लेले कुटुंबिय आणि त्यांची ठाण्यात राहत असलेली बहीण अमृता योगी आणि योगी कुटुंबियांसमवेत एका ऑनलाईन अॅपद्वारे लाईव्ह काकड आरतीचा कार्यक्रम 18 मे पासून सकाळी 6 ते 7 या वेळेत सुरू केला.
लेले कुटुंबिय जवळपास गेली 20 वर्षे न चुकता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनुग्रहित असून प्रत्येक एकादशीला नित्यनेमाने काकड आरती करतात. अनेक भक्त मंडळी त्यांच्याकडे न चुकता सकाळी 6 वाजता काकड आरतीला हजर होतात. पण लॉकडाऊन काळात एकमेकांच्या घरी जाता येत नसल्यामुळे अरुण लेले यांचे चिरंजीव आनंद लेले यांनी सर्वांना एकत्रित काकड आरतीचा लाभ मिळावा म्हणून सोशल मीडियाचा सदुपयोग करत अनेक जणांना या झूम अॅपद्वारे एकत्र आणले. या काकड आरतीचे व्हिडिओ सुद्धा ते अॅपद्वारे रेकॉर्ड करून ठेवतात. भूपाळी, काकड आरती, पंचपदी आणि त्यानंतर फेर धरणे या क्रमाने साधारण एक ते दीड तास ही काकड आरती चालते. यातील सगळी पदे आरत्या आनंद स्वतः म्हणत असतात आणि बाकीचे जण त्यांच्या पाठोपाठ म्हणतात किंवा श्रवण भक्ती करतात.
जमलेल्या सर्व मंडळींना काकड आरती म्हणता यावी म्हणून आरतीची पुस्तके pdf स्वरूपात तयार करून सर्वांना पाठवली आहेत. त्यानंतर आरतीस उपस्थित असलेल्या मंडळींपैकी एक जण गायनसेवा किंवा आनंद लेले गायनसेवा करतात त्यानंतर काकड आरतीत सामील झालेला प्रत्येक जण आपला अनुभव सांगतो आणि अशा प्रकारे काकड आरती सोहळा संपन्न होतो. लॉकडाऊन संपून पुढील सर्व परिस्थिती स्थिरस्थावर होईपर्यंत म्हणजेच अगदी कार्तिकी एकादशीपर्यंत सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.









