ऑनलाईन टीम / आइजोल :
लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग करत मिझोरामचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी इंग्रजी आणि मल्याळम भाषेत 13 पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांमध्ये कवितासंग्रहाचाही समावेश आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांच्या हस्ते आज यामधील काही पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.
पिल्लई यांची राज्यपाल होण्यापूर्वी 105 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 1983 मध्ये त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले होते. लॉकडाऊनमध्ये लिहिलेल्या 13 पुस्तकांविषयी बोलताना पिल्लई म्हणाले, लॉकडाऊनमध्ये राजभवनमध्ये कोणालाही येण्या-जाण्याची परवानगी नव्हती. आगामी दौरेही स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे वेळ खूप होता. त्याच वेळेचा सदुपयोग करत मी 13 पुस्तके लिहिली.
लहानपणापासून मी सामान्य जीवन जगतो. ग्रामीण राजकारणात मी सक्रिय आहे. नेता झाल्यावर मला पुस्तके लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी लिहीत गेलो. नेते आणि कार्यकर्त्यांना सुशिक्षित करण्यासाठी पुस्तके वाचली गेली पाहिजेत, असेही ते म्हणाले.