प्रतिनिधी/ सातारा
मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाला. तेव्हा तो 14 एप्रिलला संपणार होता. त्यामुळे सर्वजण लॉकडाऊन संपेल असे गृहीत धरुन चालले असताना कोरोनाची गंभीर स्थिती पाहता तो मे पर्यंत वाढवण्यात आलाय. मात्र, त्यामुळे घरातच थांबलेल्या अबालवृध्दांची केस, दाढी चांगलीच वाढल्याने प्रत्येकजण एकमेकांकडे पाहून हसत होते. मात्र आता लॉकडाऊन वाढल्यानंतर मात्र नाभिक भेटणारच नसल्याने शेवटी अनेकांनी मग घरच्याघरीच बॅटरीवर चालणाऱया ट्रीमरच्या सहाय्याने कटींग सुरु केले असून हा घरीच मारलेला कट ’कोरोना कट’ म्हणून प्रसिध्द झालाय.
फक्त भारतच नाही तर जगाच्या इतिहासात अशा प्रकारे लॉकडाऊन करुन सामाजिक संपर्क तोडून टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेजाऱयांशी तर आपण पूर्वीपासून फारसे बोलत नव्हतो मात्र आता शेजारी राहून देखील चार फूट अंतर राखून वागण्याची वेळ कोरोना व्हायरसने आणली आहे. थोडी भिती, थोडी मजा करता करता आता लॉकडाऊन सगळय़ांनी गांभिर्याने घेतला आहे.
मात्र लॉकडाऊनच्या काळात सर्वच दुकाने बंद असून त्यामध्ये सामाजिक संपर्क टाळण्यासाठी नाभिकांची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात कोणी ऋषीमुनी झाले तर दाढी वाढल्याने अनेकजण स्वतःची ओळख विसरल्यागत झालेत. छोटय़ा मुलांची केसेही वाढलेत आणि घरात बसून दंगाही वाढलाय. मग काहीतरी कमी झाले पाहिजे म्हणून मुले आधुनिक युगातील ट्रीमरचा वापर करुन एकेमकांची डोकी भादरु लागली असून मग कोणत्याच भौमितिक आकारात ते बसत नसल्याने शेवटी सरसकट केस कापण्यामुळे घराघरात छोटय़ांची शाकाल गँग तयार झाली आहे.
ज्यांना घरी दाढी करायाची सवय नव्हती त्यांनी वाट पाहून शेवटी सराव करत दाढी करणेही सुरु केले आहे तर अनेक मोठय़ांनी ट्रीमरच्या सहाय्याने आपल्या मुलांकडून केस कापून टाकत थेट बालाजी कट मारल्याने आता सर्व घरात थोडी शांतता नांदू लागल्याचे किस्से सोशल मिडियावर फिरत आहेत. काय वेळ आली पहा ना ? मात्र यामुळे स्वावलंबन वाढले असून घरातील स्वतःची कामे स्वःत करण्याबरोबरच एकमेकांना सहकार्य करत सहजीवनाची गोडी कोरोनाने वाढवली आहे. हा कोरोना आणि कोरोना कट लवकर हद्दपार व्हावा एवढीच आशा आता सर्वजण करत आहेत.








