शिक्षकाने साकारले कलादालन : शाळा सुरू झाल्यानंतर येणार मूर्तस्वरुप : चित्रकलेतून कोरोना जनजागृती संदेशही
तेजस देसाई / दोडामार्ग:
आपल्या ठायी जिद्द असेल तर परिस्थिती कधीच आड येत नाही. आपल्यातील उपजत कला ओळखून त्यात वाहून घेतले तर मिळणारे फळ हे यशाचे असते, हे दाखवून दिले आहे. दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग कला शिक्षक योगेश शिरीष गावीत यांनी. लॉकडाऊनचा वेळ शाळा बंद असल्याने वाया न घालविता त्यांनी कलेसाठी खर्च केला. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रशालेत त्यांच्या संकल्पनेतून कलादालन निर्माण होणार आहे. वाळूत काढलेले शिल्प हे दीर्घकाळ टिकत नसले तरी त्यातून कलाकाराची कौशल्यपूर्ण कारागिरी दिसून येते. कलाशिक्षकाचा विचार केल्यास फलक लेखन सजावट ही काही वेळाने पुसली जाते. मात्र, शिक्षक ते रेखाटन जीव ओतून काम करणे म्हणजे काय? याचा प्रत्यय दाखवितात आणि हेच गावीत यांच्या बाबतीत दिसून येते.
नंदुरबार जिल्हय़ातील खडके गावात गावीत यांचा जन्म झाला. धुळे येथे बारावीपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी एटीडीएम हे कलेतील शिक्षण पूर्ण केले. साधारण आठ वर्षांपूर्वी दोडामार्ग शहरातील विकास सावंत यांच्या संस्थेतील दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग येथे कलाविषयक शिक्षक म्हणून काम करीत आहेत.
बारावीपर्यंत कला विषय शिक्षक मिळाला नाही
गावीत ज्या शाळेत बारावीपर्यंत शिक्षण घेत असताना प्राथमिक व माध्यमिक पर्यंत शाळेत कलाशिक्षकच नव्हता. मात्र, गावित यांचा गाव निसर्गाने समृद्ध आहे. खास करून दिवाळीला नंदीबैल सजविणे व गणपतीला भिंती सजविणे यातून चित्रकला आवडत गेली. पुढे गावाशेजारील प्रसिद्ध चित्रकार देवीलाल पेंटर यांची चित्रे पाहून ते भारावले. घरची परिस्थिती साधारण असल्याने हळुहळू चित्र काढण्यासाठी जी रक्कम मिळायची, हे चरितार्थाचे साधन बनले. पुढे आवड वाढत गेली.
लॉकडाऊनमध्ये जनजागृती संदेश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉडाऊनचा गावीत यांनी अचुक फायदा घेतला व आपल्या संकल्पना पूर्ण करण्याच्यादृष्टीने त्यांनी पावले टाकली. आपणाला शाळेत कलाशिक्षक मिळाला नाही. मात्र, आपल्या शाळेत कलादालन करायचे. जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड आहे, त्यांना त्याचा फायदा होईल, असे त्यांच्या मनात होते. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यांनी विविध पेंटिंगला सुरुवात केली. खरं तर एखाद्या फलकावर चित्र व अक्षर लेखन कितीही जीव ओतून केले तरी ते पुसले जाते. मात्र, कलाकार हा प्रत्येक गोष्ट समोरून एखादी प्रतिमा जिवंत असल्याचा भास करुन देते. या लॉकडाऊनमध्ये आषाढी एकादशी, रंगपंचमी असो वा आजची लोकमान्य टिळक पुण्यतिथी या दिवशी हटके फलक लेखन करीत कोरोनाच्या जनजागृतीचे संदेशही दिले. त्यामुळे गावीत यांचे कौशल्य अधिक अधोरेखित झाले.

अमाप खजिना
गावित यांच्या कौशल्यातून अमाप खजिना साकारला गेला. वर्ल्ड आर्ट डे यांच्या नावाने साजरा होतो. ज्यांची जगविख्यात मोनालिसाचे पेंटिंग काढले ते चित्रकार लिऑनर्दो विंची, छत्रपती शिवाजी महाराज, निसर्गचित्र, फलक लेखन आदी चित्रे लॉकडाऊनमध्ये साकारली आहेत. ही कलादालनांमध्ये पहायला मिळणार असून विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रेही यात असणार आहेत. शिवाय या कलादालनास थेट देणाऱया व चित्रकलेची खरी आवड असणाऱया विद्यार्थ्यांना गावित स्वतः मार्गदर्शन करणार आहेत.









