नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी लसीचा तुटवडा तर काही ठिकाणी रूग्णांना बेड मिळत नाहीत. अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्या स्थितीवरून कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनीदेखील सरकारला घरचा आहेर दिला आहे. लॉकडाऊनच्या वेळेचा वापर आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी व्हायला हवा होता. पण त्यावेळी आपण दिवे पेटवत राहिलो, टाळ्या-थाळ्या वाजवत राहिलो, अशी टीका प्रभाकर यांनी एका कार्यक्रमात केली आहे.
परकला प्रभाकर म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोरोना लसीकणाबद्दल सरकारला काही सल्ले दिले. त्यावर केंद्रातील एका मंत्र्यानं अतिशय वाईट प्रतिक्रिया दिली. त्यांना या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वत:ला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
मोदी सरकारवर निशाणा साधत परकला प्रभाकर पुढे म्हणाले की, लॉकडाऊन हा कोरोना संकटावरचा पर्याय नाही, लसीकरण हाच कोरोना संक्रमण रोखण्याचा एकमेव उपाय आहे. लॉकडाऊनच्या वेळेचा वापर आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी व्हायला हवा होता. पण त्यावेळी आपण दिवे पेटवत राहिलो, टाळ्या-थाळ्या वाजवत राहिलो. आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून वंचित वर्गाला मदत करण्याऐवजी सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्यात व्यस्त होतं. स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. त्यातून सरकारचा निष्ठुरपणा दिसून आला.
Previous Articleअमेरिकेचे पाच टन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज दिल्लीत दाखल होणार
Next Article कोरोनाचा कहर : पंजाबमध्ये उच्चांकी रुग्ण संख्या









