मागील वर्षापेक्षा निर्यात कमी, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगली
कृषी विभागातर्फे माहिती
फळे, फुले, भाजीचीही निर्यात
कणकवली / अजय कांडर
कोरोनाने जगभर थैमान घातले आणि जनजीवन अचानक जागच्या जागी थांबले. लॉकडाऊननंतर वाहतुकीची मोठी पंचाईत झाल्याने आंबा बागायतदारांचेही प्रारंभीच्या काळात मोठे नुकसान झाले. तरी या काळातही आंबा निर्यातीला चांगले यश प्राप्त झाले असून आठ हजार सहाशे चाळीस मे. टन आंब्याची निर्यात झाली असल्याचे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळातील कोकणच्या व्यावसायिक गणिताच्यादृष्टीने ही घटना महत्वाची मानली जात आहे.
राज्यातील इतर पिकांबरोबरच कोकणातील काजू आणि आंबा ही उन्हाळय़ातील पिके धोक्मयात आली. लॉकडाऊनच्या प्रारंभीच्या काळात वाहतूक व्यवस्था नसल्याने आणि नवी मुंबईसारख्या घाऊक मार्केटमध्येही हापूस आंबा योग्य दराने घेण्याची शक्मयता कमी वाटल्याने कोकणचा हापूस आंबा फारच अडचणीत आला. दुसऱया बाजूला काजूला जानेवारीच्या प्रारंभीपासून चढता दर मिळेल, असे वाटत असताना मध्येच लॉकडाऊनमुळे काजूचाही दर पडला. काजूचा दर 80 ते 90 रुपये या अल्प दरावर स्थिरावला. मागील काही वर्षे 160 ते 170 रुपये किलो दराने काजूला स्थानिक बाजारपेठेत मार्केट मिळत असताना लॉकडाऊनमुळे तो निम्म्यावर आल्याने बागायतदारांना काजू आणि आंब्याचे एकाच वेळी नुकसान सहन करावे लागले. अशा परिस्थितीत कोकणच्या हापूसची 8 हजार 640 मे. टन निर्यात झाल्याचे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न
एका बाजूला कोरोनाविरुद्ध लढाई, तर दुसऱया बाजूला शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनातर्फे प्रयत्न करण्यात आले. यात लॉकडाऊनच्या दुसऱया टप्प्यात आंबा वाहतुकीला शासनाकडून परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दक्षिण कोकणातील आंब्याची वाहतूक मार्गाला लागली. यातही वाहतुकीची परवानगी मिळविणे आणि मार्गावर पोलिसांना तोंड देणे अशाही परिस्थितीत आंबा या नाशिवंत पिकाचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून बागायतदारांनी नवी मुंबईच्या मार्केटपर्यंत वाहतूक केली. त्यामुळे 1 एप्रिल ते 9 मे या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून 2 लाख 99 हजार 950 मे. टन मालाची निर्यात करण्यात आली. त्यात आंब्याची स्वतंत्र नोंद करण्यात आल्याप्रमाणे आंब्याची निर्यातही 8 हजार 640 मे. टन असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे.
विदेशात फळे-भाजीपाल्याची निर्यात
राज्यात कोरोना विरुद्धची लढाई सुरू असताना शासनामार्फत फळपिकासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचे सावट दूर करण्यासाठी कृषीमाल निर्यात सुरळीत ठेवण्यात यश आल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. या परिस्थितीत कृषी विभागाने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळामार्फत फळे व भाजीपाला समुद्र व हवाई मार्गाने जगभरात निर्यात केला. गेल्या दीड महिन्यात विविध देशांच्या मागणीनुसार फळे व भाजीपाल्याची निर्यात करण्यात आली.
तुलनेने निर्यात कमी झाली पण..
गेल्या वर्षाच्या निर्यातीच्या तुलनेत या वर्षाची निर्यात कमी झालेली असली, तरी लॉकडाऊनच्या काळात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून कंटेनर आणि टेलरसाठी वाहन चालकांची कमतरता असतानाही तसेच वाहतुकीवेळी रस्त्यावर कोणत्याही जेवणाची तसेच वाहन दुरुस्तीची सुविधा नसतानाही निर्यातीसाठी फळे व भाजीपाला उपलब्ध करून देणे हे कौतुकास्पद असल्याचे मत कृषी विभागाने व्यक्त केले. पुढील काळात या निर्यातीत मोठय़ा प्रमाणात वाढ होईल. त्यासाठी योग्य उपाययोजना व नियोजन केल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. अजूनही आंबा वाहतूक होत असल्याने कोकणच्या हापूस आंब्याच्या निर्यातीत अजूनही थोडी वाढ होईल, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात आंब्याला बाजारपेठ मिळविण्यासाठी राजकीय प्रयत्नही करण्यात आले होते. यात खासदार विनायक राऊत आणि आमदार नीतेश राणे यांचा पुढाकार होता.

निर्यात चांगली पण..!
लॉकडाऊनचा काळ असतानाही आंब्याची निर्यात झाली असल्याने तिचे आपण स्वागतच करायला पाहिजे. पण दुसऱया बाजूला विचार करताना लॉकडाऊनच्या प्रारंभीच्या काळापासून आंबा वाहतुकीचे प्रशासनातर्फे योग्य नियोजन करण्यात आले असते, तर कोकणच्या हापूसला अजून चांगले मार्केट मिळाले असते, असे मत प्रगतशील आंबा बागायतदार विजय सावंत यांनी व्यक्त केले.
एकूण 2 लाख 99 हजार 950 मे. टन मालाची निर्यात
निर्यात करण्यात आलेला माल (मेट्रिक टनमध्ये)
आंबा 8 हजार 640
केळी 33 हजार 948
द्राक्षे 9 हजार 509
डाळिंब 1 हजार 773
कांदा 2 लाख 25 हजार 686
लिंबू 653
मिरची 1522
आले 1168









