प्रतिनिधी /मडगाव
कोविड-19च्या रोगाने सद्या जगभर थैमान घातले आहे. अनेक लहान-मोठय़ा व्यावसायिक, नोकरवर्ग, मजूर यांना त्याचा जबरदस्त फटका बसला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार लॉकडाऊनद्वारे व विलगीकरणाद्वारे या महामारीवर मात करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांना घरातच थांबणे भाग पडले. अनेकांना जीवनावश्यक वस्तू उलपब्ध होऊ शकल्या नाही. अशा वेळी फातोर्डा मतदारसंघात माजी आमदार दामू नाईक यांनी अनेकांना आपल्या परीने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला.
गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तसेच सरकारी अधिकारी, डॉक्टर, नर्सेस व पोलीस यांनी उल्लेखनिय योगदान दिले. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत गोव्यात खुपच कमी प्रमाणात कोरोनाचा प्रभाव जाणवला. लॉकडाऊनमुळे सामान्य व्यावसायिक खास करून मोटारसायकल पायलट, रिक्शा चालक, पिकअप चालक, रोजंदारीवर काम करणारे मजूर व खासगी कंपनीत काम करणारे कामकार यांना बराच त्रास झाला. अनेकांना जीवनावश्यक वस्तू मिळविणे कठीण होऊन बसले. अशा लोकांना फातोर्डाचे माजी आमदार तथा भापजचे सरचिटणीस दामू नाईक यांनी मदतीचा हात दिला.
फातोर्डा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते तसेच मित्र परिवाराला सोबत घेत दामू नाईक यांनी फातोर्डा, मडगाव, घोगळ हाऊसिंग बोर्ड भागात अनेक उपक्रम राबवित व्यवस्थितपणे मदतीचा ओघ सुरू केला. लॉकडाऊन 1 नंतर फातोर्डा व घोगळ हाऊसिंग बोर्ड भागात कोणताही जात, पात, धर्म भेदभाव न करता बेळगांव येथून भाजी व फळे आणून अल्पदरांत लोकांना घरपोच देण्याची व्यवस्था केली. तसेच बेरोजगार मजूर कामगारांना अन्नाची पाकिटे बनवून वितरित करण्यात आली.
फातोर्डा भागात हाऊसिंग सोसायटी व अनेक बंगले, घरे, दुकानांनी सेनिटायझेशन उपक्रम राबवून तो यशस्वी केला. भटक्या श्वानासाठी ‘भूतदया’ प्रकल्प हातात घेऊन त्यांना अन्न व पाणी देण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला. या शिवाय काही संस्थांना तसेच काही गरजू लोकांना आपल्या परिने मदतीचा हात पुढे केला.
फातोर्डातील गरीब लोकांसाठी सुमारे 3000 कडधान्याची पाकीटे त्यांनी वितरित केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यात, हॉस्पिटलात व डॉक्टर नेण्यासाठी खास एका व्यक्तीची गाडीसह नेमणूक केली. ज्येष्ठ नागरिकांना त्यांची औषधे घरपोच देण्याची व्यवस्था त्यांनी केली. त्याच बरोबर फातोडर्य़ातील कंदबा बस स्थानकाजवळील मोटारसायकल पायलट संघटना, कोकण रेल्वे मोटारसायकल पायलट संघटना, मडगावातील क्रांती ऑटो रिक्शा चालक संघटना, मडगावातील मोटारसायकल चालक संघटना, मडगावातील पिकअप चालक संघटनेतील अनेक सभासदांना कडधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच मास्क व सेनिटायझरच्या बाटल्याचे वितरण देखील करण्यात आले.
हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी फातोर्डा मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर, दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, प्रमोद नाईक, दुर्गेश शिरोडकर, अनिल रहेजा, मंदार सावर्डेकर, सिद्धेश नाईक, पंकज, शिवप्रसाद, वैभव, रवीराज, मंजूनाथ, ज्योकीम, रॅन्झील, मॅथीव, हैदर, नासीर, बबिता नाईक, सुंगधा बांदेकर, दिक्षा, मनिषा, शुभांगी, संजना, दिव्या, हर्षाली, महेश, परेश, संदीप इत्यादीची साथ मिळाली.









