प्रतिनिधी / फोंडा
राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडय़ात झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे आजपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पुर्वसंध्येत फोंडय़ात पॅनिक शॉपीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र दिसले. फोंडय़ातील गोवा बागायतदारच्या सदर फोंडा व मार्केट परिसरातील दोन्ही दालनात ग्राहकांची अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी झुंबड उडाली.
कोराना बाधितांचा आकडय़ात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे इस्पितळात परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेली आहे. फॉर्मसी व जीवनाश्यक वस्तू पुरविणाऱया किराणा मालाच्या दुकाने सुरू राहणार असे आदेश दिले असतानाही ग्राहकांनी मात्र संपुर्ण बुधवार पेठ मार्केट परिसरात गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले होते. काल दिवसभर फेंडा तालुक्यात पोलिसांनी लाऊडस्पीकरसह कोरोनाविषयी जागृती मोहीम राबविली. कोरोनापासून बचावासाठी फेसमास्क परिधान करा, सामाजित अंतराचे नियम पाळा, विनाकारण बाजारात येऊ नका असे आवाहन पोलीस उपअधिक्षन नेल्सन अल्बुकर्क यांनी केले आहे.









