ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू उठवले जात आहेत. अनेक उद्योगधंदेही सुरू झाले आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘दो गज की दुरी’ अधिक गरजेची आहे. त्यामुळे सतर्क रहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला.मोदी म्हणाले, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. कोरोनाविरोधात देशात एकजुटीने लढा सुरू आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वांनी सतर्क रहायला हवे, ‘दो गज की दुरी’ खूप गरजेची आहे. संकल्पशक्ती आणि सेवाशक्ती ही कोरोना लढाईसाठी मोठी ताकद आहे. कोरोनाविरोधातील लढा दीर्घकाळ चालणारा आहे. देशातील अर्थव्यवस्थेची चाके आता फिरू लागली आहेत. त्यामुळे सावधगिरी महत्वाची आहे. आत्मनिर्भर भारतासाठी देशभरात मंथन सुरू आहे. आत्मनिर्भर भारत देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. मेक इन इंडियासाठी अनेक उद्योग सुरू करण्यात आले आहेत. तसेच मुजारांना काम मिळावे म्हणून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाकडून ‘माय लाईफ माय योग’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. योग केल्यामुळे आयुष्यावर काय परिणाम झाला, हे तीन मिनिटांच्या व्हिडीओतून सांगायचे आहे. योग, आयुर्वेदामार्फत कोरोनाला रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
आयुष्यमान योजनेचा एक कोटी जनतेने लाभ घेतला आहे. सेवाभाव म्हणून अनेकांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. अनेकांनी या सेवेत स्वतःला वाहून घेतले. त्यांचे मोदींनी विशेष कौतुक केले.









