प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्हय़ाचा धोका वाढण्याची परिस्थिती उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे निर्बंध अधिकपणे राबवा, अशी सूचना जिल्हय़ाचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी केली.
सोमवारी बेळगावात तातडीची बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 17 पर्यंत पोहोचली आहे. या वाढत्या संख्येमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करण्याची गरज आहे. प्रशासनाने या कालावधीत योग्य दक्षता घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही याकडे लक्ष पुरवावे, असे त्यांनी सुचित केले.
आतापर्यंत पॉझिटिव्ह स्वरुपात आढळून आलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांसह इतर नातलग आणि मित्रपरिवाराचा तपशील संकलित करून त्यांचीही आरोग्य तपासणी करावी, अशी सूचना आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांना केली.
या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.









