अनलॉक होणार असेल तरी धोका कायम : सर्व निर्बंध झुगारून नागरिकांची वर्दळ : गरज नसताना बाहेर पडणे टाळा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी अद्याप कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. परंतु नागरिक मात्र कोरोना गेल्याप्रमाणेच घराबाहेर पडू लागले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात येत आहे. परंतु नागरिक सर्व निर्बंध झुगारून घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनची नियमावली नेमकी कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनामुळे बेळगावसह राज्यभरात मागील दोन महिन्यांपासून
लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तरीही बेळगावमध्ये दररोज कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत होती. कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हय़ात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. संसर्ग आता काही प्रमाणात कमी झाल्याने राज्य सरकारने जिल्हय़ातील निर्बंध घटविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विकेंड लॉकडाऊन सुरूच ठेवला जाणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
रविवारी पावसाने काहीशी उघडीप दिल्याने नागरिकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली. यामुळे शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरात नागरिकांची वर्दळ दिसत होती. पोलिसांनीही कारवाईत शिथिलता आणल्याने नागरिक बिनधोकपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. यामुळे विकेंड लॉकडाऊन नेमका कोणासाठी, असा प्रश्न पडत आहे. गरज नसताना विकेंड लॉकडाऊनवेळी बाहेर पडणे टाळाच, असा सल्ला जाणकारांमधून दिला जात आहे.
… तर पुन्हा लॉकडाऊनची येईल वेळ
सोमवारपासून बेळगाव जिल्हा अनलॉक केला जात आहे. परंतु नागरिकांनी एकाच वेळी बाहेर पडून गर्दी करू नये, असेही सांगण्यात आले आहे. एकाच वेळी पुन्हा गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्मयता असल्याने प्रत्येकानेच गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.









