मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाउन १ जून रोजी संपत असून तो पुन्हा वाढवला जाणार की उठवला जाणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. आज मंत्रीमंडळ बैठक होणार असून येथे लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. लॉकडाऊनमधील शिथिलता तीन-चार टप्प्यात केली जाईल. मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्यास अनेकांचा विरोध आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रेड झोनमधील गावांना कोणताही धोका पत्करून घेण्याची गरज नाही. त्यांच्या जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित असलेले तालुके आहेत, तिथे कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यांमध्ये जास्त रुग्ण नाहीत, तिथे थोडी सवलत द्यावी आणि सूट द्यावी. उर्वरित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने कमी करावा आणि शिथिलता द्यावी असा विचार आहे. त्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकत आहोत, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.तसेच विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मुंबईची लोकल सुरू करू नका. कारण सर्वात जास्त कोरोना पसरण्याचे काम रेल्वेच्या माध्यमातून होते. त्यामुळे रेल्वेतील गर्दीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अनेकांची मागणी आहे. म्हणून आम्ही अत्यावश्यक सेवा सोडून कोणालाही लोकलमध्ये प्रवास करायला देणार नाही. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या कामात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे तिथेही थोडी शिथिलता द्यावी लागेल. अशा प्रकारे सर्व विचार करून पुढील निर्णय आम्ही घेण्याचे ठरवत असल्याचे यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
यापूर्मुंवी बईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील ५० टक्के लसीकरण झाले तरच लॉकडाऊन उठू शकतो, असे म्हटले होते. तसेच येत्या कॅबिनेटच्या बैठकीत लॉकडाऊन उघडण्याबाबातचा निर्णय होणार असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली होती.








