प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना नियंत्रणात आणायचा असल्यास कोविड-19 नियमांचे पालन करणे अपरिहार्य आहे. परंतु शहराच्या काही भागामध्ये या नियमांचे सपेशल उल्लंघन होत आहे. प्रामुख्याने शहराच्या उपनगरांमध्ये वाहनांची ये-जा व नागरिकांची वर्दळ सुरूच आहे.
शहराचा फेरफटका मारला असता अपवाद वगळता उपनगरांमध्ये कोठेही कोरोनाला गांभीर्याने घेतले गेले आहे असे जाणवत नाही. बहुसंख्य ठिकाणी कोणीही मास्क वापरत नाही. सामाजिक अंतराचा नियम तर फारच दूर. परंतु तेथे खरेदी आणि विक्री बिनधास्त सुरू आहे. त्यामुळे कोविड-19 च्या नियमांबाबत प्रशासनाचा पक्षपातीपणा कशासाठी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बहुसंख्य ठिकाणी लोकांचे घोळके जमा होऊन गप्पांचा फड रंगतो आहे. काही ठिकाणी लहान-सहान व्यवसाय उघडपणे सुरू आहेत. तरुणाई वाहनांवरून मोकाट फिरते आहे. हेल्मेट, मास्क आणि एका वाहनावर दोघे या नियमांचेही तेथे उल्लंघन होत आहे. पोलीस या भागापर्यंत पोहोचतात की नाही, असे म्हणण्याजोगी परिस्थिती आहे.
प्रशासनाने पाहणी करून समज देण्याची मागणी
मास्क आणि सामाजिक अंतराचा नियम न पाळल्यास कोरोना नियंत्रणात येण्यास अडथळा निर्माण होणार आहे. आता नियमांचे पालन करणारे सुजाण नागरिक ‘आमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या’ असे सांगत आहेत. कोविड-19 चे नियम हे सर्व जनतेसाठी समान आहेत. ते गंभीरपणे घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा भागांची पाहणी करून नियम पालन करण्यासाठी समज द्यावी, अशी मागणी होत आहे.









