प्रतिनिधी / असळज
गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊनचा गैरफायदा घेत काही किराणा दुकानदार आपल्या दुकानातील मुदत संपलेला खराब माल विकत आहेत. गगनबावडा तालुक्यातील अन्न व औषध विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. गगनबावडा तालुक्यातील एका गावामध्ये मुदत संपलेल्या श्रीखंडची विक्री राजरोस करण्यात येत होती. परंतु एका सुशिक्षित माणसाच्या हाती हे श्रीखंड पडल्याने या श्रीखंडामध्ये अळी सापडल्याने त्या गावामध्ये गाव बैठक घेण्यात आली.
यामध्ये गगनबावडा तालुक्याच्या पूर्वेस असणाऱ्या एका कंपनीची ती श्रीखंड डबी मुदत संपूनही दुकानदार ग्राहकांच्या माथी मारत होते. यामुळे सदर दुकानदारांना गाव बैठकने पुन्हा असे घडल्यास कारवाईची धमकी दिल्याने यावर पडदा पडला. परंतु याशिवाय काही दुकानदार आपला खाद्य पदार्थ माल अव्वाच्या सव्वा दराने विकत असून त्या दुकानदारांनी नागरिकांना वेठीस धरले आहे. गगनबावडा तालुक्यातील तहसील विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या किराणा दुकानदारावर कडक कारवाईची गरज आहे. यापूर्वी थंड पेयामध्ये, बटरमध्ये अळी सापडण्याची तक्रार गगनबावडा तालुक्यातील काही गावामधील ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायतमध्ये करण्यात आली होती. यामुळे गगनबावडा तालुक्यातील तहसील विभागाने याकडे तात्काळ लक्ष घालून ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकातून होत आहे.