मुख्यमंत्र्यांची माहिती : रविवारी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्याऐवजी कठोर नियम जारी करण्यात येतील. यासंदर्भात 18 एप्रिल रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी विरोधी पक्षातील नेत्यांचेही सल्ले घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी विधानसौध आवारातील त्यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 18 एप्रिल रोजी आपण सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना नियंत्रणासाठी कठोर नियम जारी करण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल. कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनशिवाय उर्वरित सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील, असे सांगून येडियुराप्पा यांनी राज्यात लॉकडाऊन जारी करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत त्याप्रमाणे कर्नाटकातही उपाययोजना करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, लॉकडाऊन वगळून उर्वरित कठोर नियमांविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. विरोधी पक्षातील नेत्यांचे सल्लेही सकारात्मकपणे विचारात घेण्यात येतील. कोरोना थोपविण्यासाठी आवश्यकता भासल्यास इतर जिल्हय़ांमध्ये देखील नाईट कर्फ्यू जारी करण्यात येईल, असे ते म्हणाले.
विकेंड लॉकडाऊनचा प्रस्ताव नाही
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन जारी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. आरोग्य खाते, कोविड तांत्रिक सल्लागार समितीतील तज्ञांशी देखील चर्चा करण्यात येणार असून मार्गसूचीत बदल करावा का? यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले.
अफवांकडे दुर्लक्ष करा : गृहमंत्री बसवराज बोम्माई
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले. बिदरमधील हुमनाबाद येथे पत्रकारांशी ते बोलत होते. लॉकडाऊनशिवाय इतर पर्यायी उपाययोजना करून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी जनतेनेही सहकार्य करावे. मागील वेळी कोरोनाची लाट तीव्र असताना झालेल्या परिणामांची जाणीव आपल्याला आहे. याच्या आधारे संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास प्राधान्य देण्यात आले. लॉकडाऊनविषयी पसरलेल्या अफवांकडे कोणीही लक्ष देऊ नये, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊन जारी करण्यास शिवकुमारांचा विरोध

राज्यात लॉकडाऊन जारी करण्यास आपला विरोध आहे. लॉकडाऊनमुळे कोणालाही अनुकूल होणार नाही. लॉकडाऊनपेक्षा लोकांचा जीव आणि जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे या दृष्टीने सरकारने उपाययोजना हाती घ्याव्यात, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिला. बेंगळूरमधील प्रदेश काँग्रेस कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून ते बोलत होते. लॉकडाऊन जारी करण्याऐवजी कठोर नियम जारी करावेत. सर्वपक्षीय बैठकीसाठी आपल्याला अद्याप पत्र आलेले नाही. ते आल्यानंतर पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. राज्यात कोणत्याही कारणास्तव लॉकडाऊन जारी करू नये. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी महाराष्ट्राप्रमाणे किंवा इतर कोणत्याही राज्यांनी अनुसरलेल्या उपाययोजनांबाबत आपण प्रतिक्रिया देणार नाही. सरकारने आपल्याला बोलावून चर्चा केल्यानंतर आपल्या सल्ल्यांची दखल घ्यावी. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलाविली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.









