मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्याऐवजी कठोर नियम जारी करण्यात येईल. यासाठी 18 एप्रिल रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी विरोधी पक्षातील नेत्यांचेही सल्ले घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी विधानसौध आवारातील त्यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 18 एप्रिल रोजी आपण सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना नियंत्रणासाठी कठोर नियम जारी करण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल. कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनशिवाय उर्वरित सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील, असे सांगून येडियुराप्पा यांनी राज्यात लॉकडाऊन जारी करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत त्याप्रमाणे कर्नाटकातही उपाययोजना करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, लॉकडाऊन वगळून उर्वरित कठोर नियमांविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. विरोधी पक्षातील नेत्यांचे सल्लेही सकारात्मकपणे विचारात घेण्यात येतील. कोरोना थोपविण्यासाठी आवश्यकता भासल्यास इतर जिल्हय़ांमध्ये देखील नाईट कर्फ्यू जारी करण्यात येईल, असे ते म्हणाले.
विकेंड लॉकडाऊनचा प्रस्ताव नाही
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन जारी करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही. आरोग्य खाते, कोविड तांत्रिक सल्लागार समितीतील तज्ञांशी देखील चर्चा करण्यात येणार असून मार्गसूचीत बदल करावा का? यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले.
अफवांकडे दुर्लक्ष करा -गृहमंत्री
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले. बिदरच्या हुमनाबाद येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी लॉकडाऊनशिवाय इतर पर्यायी उपाययोजना करून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी जनतेही सहकार्य करावे. मागील वेळी कोरोनाची लाट तीव्र असताना झालेल्या परिणामांची जाणीव आपल्याला आहे. याच्या आधारे संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. लॉकडाऊनविषयी पसरलेल्या अफवांकडे कोणीही लक्ष देऊ नये, असे ते म्हणाले.









