सध्या सर्वजण लॉकडाऊन अवस्थेत आहेत. घराबाहेर पडायचे नसल्याने व्यायामासाठी काहीही पर्याय आपल्याकडे उरलेला नाही. म्हणजे जिम नाही, बागेत जाणे नाही अगदी रस्त्यावर धावण्याचाही पर्यायही नाही. मात्र या आव्हानात्मक काळात तंदुरूस्ती आणि रोगप्रतिकारक क्षमताही अबाधित राखणे महत्त्वाचे आहेच. त्यासाठी घरच्या घरी काही सोपे व्यायाम करता येतील.
- रशियन ट्विस्ट : जमिनीवर झोपावे आणि पाय गुडघ्यातून वाकवावे. हात जमिनीलगत ठेवावे. शरीराचा कंबरेपासूनचा भाग आणि पाय जमिनीपासून वर उचलावे जेणेकरून उलट आणि सुलट व्ही असा आकार दिसेल. नंतर पाय जमिनीला टेकवावे. हातात बॉल घेऊन हात समोर पसरावेत. आता हात आणि कंबरेच्या वरचा भाग एका बाजूला वळवावेत. काही सेकंद थांबून पूर्वस्थितीत सरळ व्हावे. मग दुसर्या बाजूला कंबरेचा वरचा भाग आणि बॉल धरलेले हात वळवावेत. थोडक्यात कंबर वळवून दोन्ही कडे वळावे त्यामुळे कंबरेचा व्यायाम होईल.
- हाफ ब्रिज : जमिनीवर आसन घालून पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवावे. दोन्ही हात जमिनीवरच असावेत. शक्य झाल्यास पायाचे घोटे हाताने धरू शकता. श्वास घेत कंबरेचा खालचा भाग वर उचलावा. शरीर वर उचलल्यानंतर काही सेकंद तसेच थांबावे. आता श्वास सोडत कंबर पुन्हा जमिनीला टेकवावी.
- लेग लिफ्ट : त्यासाठी जमिनीला पाठ टेकवून झोपावे. हाताचे तळवे जमिनीला लागून असावेत. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा. हळूहळू श्वास सोडत पाय हळुहळु वर उचलावेत. कंबर उचलू नये. पाय उचलून 90 अंशाचा कोन व्हायला पाहिजे. या स्थितीत 20 ते 25 सेकंद थांबावे. त्यानंतर पुन्हा पूर्वस्थितीला यावे. हे आसन पहिल्यांदाच करणार असाल तर पाय जास्त वेळ वर उचलून धरू नयेत. पहिल्यांदाच करताना पाय खूप वेळ वर उचलून धरल्यास पोटाच्या स्नायूंना वेदना होऊ शकतात.