टिळकवाडी पोलीसस्थानक हद्दीत घडली होती घटना
प्रतिनिधी / बेळगाव
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया नराधमाला तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने दहा वर्षांची कठीण शिक्षा आणि 55 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सुखविंदरसिंग वरदीसिंग चुग उर्फ रोणीसिंग (वय 32, रा. नववा क्रॉस, भाग्यनगर, गुलमोहोर कॉलनी) असे त्या आरोपीचे नाव आहे.
त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. बेंगळूर येथे अत्याचार केल्यानंतर सुब्रमण्यमपूर पोलीस स्थानकामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्या मुलीला त्याने बेळगावला आणले. तेथेही त्याने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर टिळकवाडी पोलीस स्थानकात 18 मे 2015 रोजी सुखविंदरसिंग याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
टिळकवाडी पोलिसांनी भा.दं. वि. 376, 506, सहकलम 34 आणि पोक्सो 4 आणि 6 कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात गिसीराखी दयास (वय 35, रा. शाहूनगर) हिचाही समावेश होता. म्हणून तिच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली.
टिळकवाडी पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. ए. जाधव यांनी तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले. त्या ठिकाणी 14 साक्षी, 6 मुद्देमाल, 29 कागदोपत्री पुरावे तपासण्यात आले. त्यामध्ये आरोपी सुखविंदरसिंग दोषी आढळला. त्यामुळे न्यायाधीश मंजय्या हणमंतय्या अणयण्णावर यांनी त्याला 10 वर्षे कठीण शिक्षा आणि 55 हजार रुपये दंड ठोठावला आहे. याचबरोबर अत्याचारीत मुलीला 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असेही न्यायाधीशांनी निकालात म्हटले आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.









