बेंगळूर / वृत्तसंस्था
लडाख आणि वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी भारताने जोरदार तयारी चालवली आहे. त्यानुसार हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने बनविलेली दोन लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) लेहमध्ये तैनात करण्यात आली आहेत. भारतीय वायुसेनेला (आयएएफ) लेह पर्वतरांगांच्या उंच-उंच ठिकाणी पोहोचण्यासाठी या हेलिकॉप्टरची मोठी मदत होणार आहे.
लेह आणि लडाखच्या उंच टेकडय़ांवरील चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारतीय हवाई दल आधीच सज्ज आहे. त्यातच आता नव्याने एचएएलने विकसित केलेली अशी दोन हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स लेह सेक्टरच्या उंचीच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. या लढाऊ विमानांच्या तैनातीनंतर लेहमध्ये आयएएफची रणनीतिक क्षमता आणखी वाढली आहे. हवाई दल आणि लष्कराला अशा स्वरुपाच्या सुमारे 160 हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे. संरक्षण खरेदी परिषदेने अशा 15 हेलिकॉप्टरच्या प्रारंभिक हेलिकॉप्टर्सच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, असे एचएएलकडून सांगण्यात आले.
एचएएलने आपल्या एका ट्विटद्वारे लेह सेक्टरमध्ये आपल्या दोन हेलिकॉप्टरच्या तैनातीची माहिती दिली. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने या हेलिकॉप्टर्सची बांधणी केलेली आहे, अशी माहिती एचएएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी बुधवारी दिली. लेहमध्ये तैनात करण्यात आलेली ही जगातील सर्वात हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत. भारतीय सशस्त्र दलाच्या विशेष गरजा भागवण्यासाठी एचएएलने हे हेलिकॉप्टर तयार केले आहे. एचएएलची ही कामगिरी आत्मनिर्भर भारत अभियानाची नांदी असल्याचेही माधवन यांनी नमूद केले आहे.