बेडसाठीही रांग – दिवसातून एक तास वीज, आरोग्य सेवा ठप्प
वृत्तसंस्था / बैरूत
पश्चिम आशियाई देश लेबनॉन सध्या भीषण संकटात आहे. पाणी 8 तर अन्नधान्य 8 पटीने महागले आहे. खाद्यसामग्रीपासून डिझेल-पेट्रोल, गॅस आणि दैनंदिन गरजेच्या सामग्रीसाठी लोकांना 4 ते 6 तासांपर्यंत रांगेत उभे रहावे लागत आहे. एक वर्षापूर्वी 1 हजार लेबनॉन पाउंडमध्ये (सुमारे 48 रुपये) ब्रेड मिळत होता, तो आता 6 हजार लेबनॉन पाउंडमध्ये (सुमारे 288 रुपये) मिळत आहे.
सरकारकडून पुरवठा होणारी वीज दिवसातून केवळ एकच तास उपलब्ध होत आहे. कार्यालयांचे कामकाज एक-तृतीयांशच होऊ शकत आहे. कोरोना महामारीदरम्यान आरोग्य सेवा कोलमडून पडली आहे. मुलांना शाळेत जाता येत नसल्याची स्थिती आहे.
जानेवारीमध्ये 1 हजार लेबनॉन पाउंडमध्ये मिळणारे एक लिटर डिझेल-पेट्रोल आता 6500 लेबनॉन पाउंड प्रतिलिटर झाले आहे. देशाची 78 टक्के लोकसंख्या गरीबीला तोंड देत आहे. या संकटामुळे अराजकतेची स्थिती निर्माण होऊ शकेत. लोक जिवंत राहण्यासाठी लुटमार आणि हिंसेचा मार्ग पत्करू शकतात.
150 वर्षांमधील सर्वात खराब स्थिती

लेबनॉन सध्या जगातील मागील 150 वर्षांमधील सर्वात खराब स्थितीत असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. लेबनॉनमये मागील दोन वर्षांपासून आर्थिक संकटामुळे स्थिती अधिकच बिघडली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये हजारो लोक निदर्शने करत आहेत. दंगली देखील होत आहेत. स्थानिक सरकारकडे स्वतःसाठी सुरक्षित जीवन आणि अन्नाची मागणी लोक करत आहेत. स्थिती बिघडल्याने अनेक शहरांमध्ये सैन्य तैनात करावे लागले आहे.
कर्ज घेण्याचा धडाका
आर्थिक संकटाचे सर्वात मोठे कारण 1975 ते 1990 पर्यंत गृहयुद्धानंतरच्या सरकारांनी सातत्याने कर्ज घेतले आहे. यामुळे कर्जाचा भार वाढत गेला. देशाच्या चलनात 2019 पासून आतापर्यंत 90 टक्क्यांची घसरण झाली आहे. म्हणजेच लोकांकडील 100 रुपयांचे मूल्य आता 11 रुपयेच राहिले आहे. ऑक्टोबर 2019 पासून खाद्यसामग्रीच्या किमतींमध्ये 600 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. 4 वर्षांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत 30 टक्क्यांची घसरण झाली आहे.
जलसंकटाचे कारण आर्थिक संकट, वीज आणि इंधनाच्या कमतरतेमुळे पाण्याचे पम्पिंग प्रभावित आहे. यामुळे पाण्याचा पुरवठा मर्यादित झाला आहे. 17 लाख सीरियन शरणार्थी या संकटात भर घालत आहेत. इंधन अनुदान संपुष्टात आणले गेले आहे. मध्यवर्ती बँकेने अंग काढून घेतल्याने इंधनाची आयात कमी झाली आहे.









