ऑपरेशन मेघदूतचे केले नेतृत्व : पाकिस्तानला चकवा देणारी मोहीम
वृत्तसंस्था/ चंदीगड
1984 मधील ‘ऑपरेशन मेघदूत’चे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) प्रेमनाथ हून यांचे मंगळवारी निधन झाले आहे. 91 वर्षीय हून यांच्यावर पंचकूला येथील रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. हून यांच्या नेतृत्वाखालीच भारताने जगातील सर्वाधिक उंचीच्या युद्धभूमीवर झालेल्या पहिल्या लढाईत विजय मिळविला होता.
पाकिस्तानच्या कब्जातील सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वपूर्ण सियाचीन आणि परिसरातील सर्व हिमशिखरांवर ताबा मिळवत तिरंगा फडकविण्यात आला होता. हून यांना ऑपरेशन मेघदूतमधील भूमिकेसाठी परम विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले होते.
भारतीय सैन्याने 1981 मध्ये सियाचीन हिमशिखरावर ताबा मिळविण्याचा निर्धार केला होता. पण तेथील तापमानासाठी सैनिकांना सज्ज करण्याचे मोठे आव्हान होते. याकरता 1982 मध्ये भारताने सैनिकांचे एक पथक अंटार्क्टिका येथे पाठविले, तेथे त्यांना अत्यंत कमी तापमानात युद्धासाठी सज्ज होण्याचे प्रशिक्षण मिळाले. पाकला याचा सुगावा लागला होता.
‘ऑपरेशन अबअबील’
पाकने भारतापूर्वीच सियाचीनवर कब्जा करण्याचा प्रयत्न चालविला होता. हिमशिखरांवर कब्जा करण्याच्या या मोहिमेला पाकने ‘ऑपरेशन अबअबील’ नाव दिले होते. पाकने सैनिकांची तुकडी तयार करत बर्फात वापरल्या जाणाऱया सामग्रीसाठी लंडन येथील एका कंपनीशी संपर्क साधला. पण पाकच्या दुर्दैवामुळे ही कंपनी भारताला सामग्री पुरविणारी होती.
ऑपरेशन मेघदूत
मे 1984 मध्ये सियाचीनसंबंधी पाक मोहीम सुरू करणार असल्याचे भारतीय गुप्तचरांनी शोधून काढले होते. भारताने त्यापूर्वी लेफ्टनंट जनरल हून यांच्या नेतृत्वाखाली 13 एप्रिल 1984 रोजी ऑपरेशन मेघदूतास प्रारंभ केला. भारताच्या बाजूने सियाचीन सर करणे अवघड असल्याने ऑपरेशन मेघदूत अत्यंत आव्हानात्मक मानले गेले. हे एक वेगळय़ा प्रकारचे युद्ध होते आणि यात भारतीय सैनिकांनी उणे 40 ते उणे 60 अंश तापमानात सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमीवरील पहिल्या युद्धात विजय मिळविला होता.
भारताने सियाचीन आणि परिसरातील सर्व प्रमुख हिमशिखरांवर ताबा मिळवत स्वतःची चौकी उभारली. पाकिस्तानच्या युद्ध इतिहासात हा सर्वात लाजिरवाणा पराभव मानला गेला आहे.









