प्रवासात किंवा फुरसतीच्या वेळी एखादं रहस्यकथेचं पुस्तक वाचायला घेतलं आणि त्याची पृ÷संख्या खूप असेल तर अनेकदा आपण ते नकळत घाईघाईने वाचतो. कथेच्या शेवटाबद्दल उत्कंठा असते म्हणून असं होतं. एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल आणि परीक्षक निकाल जाहीर करताना भाषण द्यायला लागले तर स्पर्धक मनातल्या मनात चिडतात आणि म्हणतात, बाबा रे, तुझा पाल्हाळ आटोपता घे आणि निकाल जाहीर कर.
राम गणेश गडकऱयांचा गोष्टीवेल्हाळ धुंडीराज प्रेक्षकांना/वाचकांना हसवतो खरा. पण प्रत्यक्ष जीवनात पाल्हाळिक माणसं लोकप्रिय नसतात. त्यांचं बोलणं ऐकताना समोरच्याला जांभई लपवावी लागते.
सोशल मीडियावर कोणी हातभर लांबीची पोस्ट टाकली तर कोणी वाचत नाही. थोडक्मयात काय, थोडक्मयात लिहा, सांगा म्हणजे तुमचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील.
आमच्या कौटुंबिक परिचयातली एक महिला आहे. दूर राहते. तिला काम नसेल तेव्हा फोन लावते. एकदा आपण फोन घेतला की अर्ध्या तासाची निश्चिंती. धबधब्यासारखी बोलतच राहते. लेडी धुंडीराजच! तिच्या बोलण्यात स्वल्पविराम किंवा पूर्णविराम अभावानेच असतात. आपण जेवायला किंवा उपवास सोडायला बसलेलो असतो किंवा टीव्हीवर छान कार्यक्रम चालू असतो किंवा समोर पाहुणे असतात. अशा वेळी तिचा फोन आला की आम्ही तो घेत नाही.
एकदा असंच झालं. टीव्हीवर एक चांगली मालिका (हा दुर्मिळच योग!) बघत होतो. फोन वाजला. स्क्रीनवर पाहिलं. लेडी धुंडीराजचा फोन होता. मनात विचार आला, मालिका संपल्यावर अर्ध्या तासाने उलट फोन करू. पण काय झालं, मालिकेच्या मध्ये जाहिरातींचा ब्रेक असताना दुसरा फोन आला. मितभाषी मित्राचा असल्याने घेतला. एक दोन वाक्मये बोलल्यावर तो संवाद संपला. फोन बंद करताना लक्षात आलं की मी मितभाषी मित्राशी बोलत असताना लेडी धुंडीराजचा मिस्ड कॉल येऊन गेलाय. याचा अर्थ मी फोन घेऊ शकत असताना तिचा घेतला नाही हे तिला समजलंय.
नंतर तिचा फोन आला नाही. आम्ही विसरून गेलो. चार दिवसांनी समजलं की तिच्या नवऱयाला अचानक दवाखान्यात नेलं होतं. धावपळीत तिला मदत हवी होती. पण तिच्या अति बडबडीच्या भीतीने आम्ही फोन घेणं टाळलं होतं. क्षमा मागून ते भांडण मिटवलं.
बोलघेवडी माणसं यातून धडा घेतील का? छे!








