प्रा. वैजनाथ महाजन यांचे प्रतिपादन :15 व्या शेकोटी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
प्रतिनिधी/ फोंडा
साहित्य निर्मिती ही झटपट होत नसते. त्यासाठी अखंड परिश्रम व ध्यास लागतो. चिरंतनाची ती साधना असते. त्यासाठी लेखक, कविला फार खस्ता खाव्या लागतात. सर्जनशिल व प्रभावी लेखनासाठी भाषेची उत्तम जाण व वास्तवाचे अचूक भान हवे. आत्मा सजग ठेऊन प्रत्येक गोष्ट चिमटीने उचलून ओंजळीने देणारेच सर्जनशिल साहित्यिक असतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.
कोकण मराठी परिषद, गोवा आयोजित 15 व्या शेकोटी साहित्य संमेलनात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. केरी-फोंडा येथील श्री विजयादुर्गा मंदिरच्या सभामंडपात काल शनिवारी सायंकाळी या संमेलनाला सुरुवात झाली. पुणे येथील कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. कोकण मराठी परिषदेच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप, कोमपचे अध्यक्ष सागर जावडेकर, सचिव चित्रा क्षीरसागर, खजिनदार अजित नार्वेकर, विजयादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष आनंद देसाई आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
लेखनामागील प्रेरणा व उद्देश सांगताना, श्री. महाजन म्हणाले, लेखकांनी सभोवताली घडणाऱया घडामोडींबाबत डोळस असले पाहिजे. वास्तवाचे भान ठेवत सतत नाविन्याचा शोध घ्यायला हवा. नैतिकता हे कलावंतासाठी पहिले तत्त्व असते. त्याला कुठल्याही परिस्थितीत नैतिकतेचा त्याग करता येणार नाही. विद्रोहाला न घाबरता सर्वस्व देण्याची तयारी ठेवणारेच उत्तम लेखक बनू शकतात.
तेव्हाच देशाचे भाग्य उजळेल
साहित्य व राजकारणावरही त्यांनी टिपण्णी केली. राजकारणी व साहित्यिक ज्या दिवशी हातात हात घेऊन सोबत चालतील तेव्हाच देशाचे भाग्य उजळेल. दुर्दैवाने साहित्याची जाण व लेखकांना सन्मान देणाऱया राजकारण्यांची उणिव असल्याची खंत व्यक्त करताना, ते म्हणाले, यशवंतराव चव्हाणासारखे पुढारी विधान परिषद, राज्यसभेतील जागा लेखकांना सन्मानाने द्यायचे. याच जागा आज काही कोटी रुपयांसाठी विकल्या जातात. आज साहित्यिक व राजकीय पुढाऱयांमध्ये संवाद तुटलेला आहे.
जगणे व लिहिणे यांचे दृढ नाते : कुलकर्णी
संमेलनाच्या उद्घाटिका अंजली कुलकर्णी यांनी जगणे आणि लिहिणे यांचा दृढ संबंध असल्याचे सांगितले. संवेदना व मनाची कोवळीक जपणे आवश्यक आहे. ही संवेदनशिलता जगण्याच्या झंझावातापासून जपली जाईल, तेव्हाच सर्जनशिल साहित्य निर्मिती होईल. माणसाचे जीवन हे निसर्ग, नातेसंबंध व अंर्तमनातील गूढ घडामोडी या तीन पातळय़ांवर विभागले आहे. साहित्याची उत्पत्तीही या तीनही गोष्टींशी निगडीत असते. शब्दामध्ये ते पकडता आले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
सामाजिक प्रश्न साहित्यातून उमटले पाहिजेत
आपल्या प्रास्ताविक ऍड. रमाकांत खलप यांनी साहित्य संमेलने ही नुसता उपचार ठरु नये असे सांगून सामाजिक प्रश्न साहित्यातून उमटले पाहिजेत असे नमूद केले. सध्या गोव्यात गाजत असलेल्या म्हादईच्या प्रश्नावर साहित्यिकांनीही बोलले पाहिजे. कारण म्हादईचा प्रवाह एका अर्थाने पर्यावरण, संस्कृती व भाषेशीही जोडला गेला आहे. लेखकांनी हा धोका पत्करुन धैय दाखविण्याचे आवाहन त्यांनी केले. शेकटी संमेलनाच्या आयोजनामुळे केरी सारख्या गावात जुन्या शेकोटय़ांचा पुन:प्रत्यय आल्याची भावना आनंद देसाई यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. नवोदितांना नवनिर्मितीची उर्जा मिळावी हे शेकटो संमेलनाचे प्रयोजन असल्याचे सागर जावडेकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले.
ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत करुन व शेकोटी पेटवून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रकाश क्षीरसागर यांच्या ‘मामीच्या बोक्याला हो’, लक्ष्मण पित्रे यांच्या ‘सुक्तीसुधास्वाद’, गुरुदास नाटेकर यांच्या ‘शब्द तुषार’ तर नारायण महाले यांच्या ‘घर कौलारु’ या चार पुस्तकांचे यावेळी प्रकाशन झाले. देवस्थानचे अध्यक्ष आनंद देसाई व उपाध्यक्ष देवेंद्र ढवळीकर यांचा यावेळी मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. चित्रा क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय तर श्वेता महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उर्विजा नागवेकर हिने ईशस्तवन सादर केले.
उद्घाटन सोहळय़ापूर्वी ‘जगण्यासाठी विनोदाची गरज आहे का?’ या विषयावर परिसंवाद झाला. ऍड. विलास कुवेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, विनोद गायकवाड, अजंली आमोणकर व अनंत काजरेकर यांनी विचार मांडले.
संमेलनाचा आज समारोप
आज रविवार 19 रोजी सकाळी 6.30 वा. चाफा कवीसंमेलन चित्रसेन शबाब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सकाळी 9.30 वा. ‘वाचन आणि वाचक’ याविषयावर परिसंवाद होईल. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या परिसंवादात अशोक याळगी व नितीन लाळे यांचा सहभाग असेल. यावेळी होणाऱया पुस्तक चर्चा कार्यक्रमात लक्ष्मण पित्रे यांच्या पुस्तकावर डॉ. सोमनाथ कोमरपंत, प्रकाश क्षीरसागर यांच्या पुस्तकावर विलास कुवळेकर, तर नारायण महाले यांच्या पुस्तकावर प्रा. विनय बापट हे बोलणार आहेत. 11.30 वा. ‘आजचा युवक आव्हानापासून दूर पळतोय का?’ या विषयावर परिसंवाद होईल. प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या परिसंवादात प्रा. नारायण महाले, सीमा क्षीरसागर, राघोबा पेडणेकर, सुभाष जाण, सोनाली सावळ देसाई व प्रा. स्नेहा देसाई यांचा सहभाग असेल. दुपारी 2.30 वा. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा होईल. शिक्षिका निता कामत म्हामाई व सुधा ढवळीकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
दुपारी 3 वा. समारोप, खुले व्यासपीठ व ठराव, त्यानंतर सायं. 4 वा. ‘कवितेचे बेट’ हा आनंद पेंढारकर व महेश देशपांडे यांचा कार्यक्रम होणार आहे.









