सतीश सावंत यांचे प्रत्युत्तर : चाकरमान्यांबाबत नीतेश राणेंची दुटप्पी भूमिका आश्चर्यकारक!
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
पडवे येथील खासगी लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये सरकारी पैशात लॅब करण्यासाठी आमदार नीतेश राणे खटाटोप करीत आहेत. मात्र गोरगरीबांना खऱया अर्थाने सेवा मिळण्यासाठी शासकीय लॅब होण्यासाठी जिल्हय़ातील सर्व जनतेची मागणी आहे आणि त्यासाठी आमचीही उच्च न्यायालयामध्ये रिटपीटीशन दाखल करण्याची तयारी आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांची राणेंचे नेतृत्व स्वीकारण्याअगोदर शासकीय लॅब व्हावी, अशी मागणी होती. मात्र आता त्यांची भूमिका बदलली, याची खंत आहे. एकीकडे सिंधुदुर्गात चाकरमानी आले पाहिजेत, अशी भूमिका मांडणारे आमदार राणे चाकरमानी कोरोनाचा टाईमबॉम्ब घेऊन फिरत आहेत, असेही म्हणत आहेत. हा विरोधाभासच असून जनतेच्या डोळय़ात ते धूळफेक करीत असल्याची टीका शिवसेनेचे पदाधिकारी तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली.
कोरोना तपासणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये लॅब होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तीही शासकीय लॅब होणे गोरगरीब लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे. यासाठी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी साडेआठ कोटीचा निधीही आणला आणि त्या दृष्टीने लॅब होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर या लॅबसाठी आवश्यक निधी देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून एक कोटीचा निधीही मंजूर केला आहे. विनायक राऊत, वैभव नाईक हे सुद्धा जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी शासकीय लॅब होण्यासाठी प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे बोलणे होऊन लॅब सुरु करण्यास मान्यताही मिळालेली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्यास महिन्यात लॅब सुरू होऊ शकते. असे असताना आमदार राणे आपल्या खासगी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये सरकारी पैशात लॅब होण्यासाठी प्रयत्नात आहेत. खरं तर सरकारी हॉस्पिटलमध्ये लॅब झाल्यास गोरगरीबांना तपासण्या करणे परवडणार आहे. शासकीय लॅब झाल्यास निश्चित सर्वांना त्याचा उपयोग होणार आहे. केवळ सरकारी पैसा मिळविण्यासाठीच खासगी हॉस्पिटलमध्ये लॅब होण्यासाठी त्यांचा खटाटोप चाललेला आहे. लॅब होण्यासाठी ते उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल करीत असतील, तर शासकीय लॅब होण्यासाठी रिटपिटीशन दाखल करण्याची आमचीही तयारी आहे असे ते म्हणाले.
चाकरमान्यांना सिंधुदुर्गात आणण्याची आमची भूमिका असल्याचे आमदार राणे सांगत आहेत. परंतु दुसऱया बाजूने सिंधुदुर्गात आलेले चाकरमानी कोरोनाचा टाईमबॉम्ब घेऊन फिरत आहेत, असेही म्हणत आहेत. त्यामुळे त्यांच्या दोन्ही भूमिका विरोधाभासाच्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांनी कोरोनाचे राजकारण न करता सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. प्रशासनाचे मनोधेर्य वाढविण्यासाठी त्यांच्या पाठिशी राहावे. कोरोनाचे राजकारण थांबवावे अन्यथा शिवसेनाही शांत न बसता विरोधकांना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा सावंत यांनी दिला.









