2025 पर्यंत निर्मिती क्षेत्र होणार मजबूतः आयसीईएच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॅपटॉप आणि टॅबलेट या उपकरणांची निर्मिती करण्याची भारताची उलाढालीची क्षमता येत्या 2025 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचण्याचे संकेत आहेत. परंतु या कार्यक्षमतेला वेग देण्यासाठी योग्य योजना आखण्याची आवश्यकता असल्याचे मत मोबाईल इक्विपमेंट इंडस्ट्रीज संस्था इंडियन सेल्युलर ऍण्ड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन यांच्या (आयसीईए) अहवालामधून व्यक्त करण्यात आले आहे.
आयसीइएच्या माहितीनुसार लॅपटॉप आणि टॅबलेट पीसी आदींची निर्मिती वाढून भारत जागतिक बाजारात 26 टक्क्यांची हिस्सेदारी प्राप्त करण्याचा अंदाज आहे. यासोबतच 5 लाख नवीन रोजगारांची निर्मिती करण्याचे संकेत आहेत. यासह 2025 पर्यंत एकूण मिळून 75 अब्ज डॉलर्स विदेशी चलन तसेच एक अब्ज डॉलरपेक्षा अधिकची गुंतवणूक प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
देशाचा इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ 65 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचलेली आहे. यामध्ये मोबाईल फोनचा मोठा वाटा आहे. लॅपटॉप आणि टॅबेलटच्या संदर्भातील आकडेवारी ही आयातीवर निश्चित होते. कारण जवळपास 87 टक्के आयात ही चीनमधून होते. भारतात लॅपटॉप बाजार इतका मोठा नसून टॅबलेट बाजाराचाही आकार लहानच आहे, असे आयसीईएचे अध्यक्ष पंकज महेंदू यांनी म्हटले आहे.
आयसीईएचे सदस्य
आयसीईएचे सदस्य असणाऱयांमध्ये ऍपल, शाओमी, मोटोरोला, नोकिया, फॉक्सकॉन, प्लेक्सट्रॉनिक्स, लावा, वीवो आदींचा समावेश आहे.
मोबाईल हँडसेट कंपन्यांमध्ये रोजगार
हँडसेट उद्योगाने निर्णय घेतला आहे, की येत्या 2021 पर्यंत एकूण 50 हजार जणांना रोजगार देणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. कंपन्या आपले उत्पादन वाढविण्यासाठी व निर्यातीस चालना देण्यासाठी नव्या उमेदवारांना संधी उपलब्ध करून देणार आहेत. मोबाईल हँडसेटची मागणी वेग घेत असल्याने या क्षेत्रात विविध टप्प्यावर मनुष्यबळाची गरज येत्या काळातही भासणार आहे. याच स्तरावर ही नोकरभरती होणार असल्याचे स्पष्टीकरण आयसीईचे अध्यक्ष पंकज मोहिंदू यांनी दिले आहे.









