वृत्तसंस्था/ खाईस्टचर्च
रविवारपासून येथे सुरू झालेल्या बांगलादेशविरूद्धच्या दुसऱया कसोटीला यजमान न्यूझीलंडने दणकेबाज सुरूवात केली. दिवसअखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 1 बाद 349 धावा जमविल्या. कर्णधार टॉम लॅथम 186 धावांवर खेळत असून कॉनवे 99 धावांवर खेळत आहे. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 203 धावांची भागिदारी केली. लॅथमने यंगसमवेत पहिल्या गडय़ासाठी 148 धावांची भर घातली.
या कसोटी मालिकेत बांगलादेशने पहिला सामना जिंकून न्यूझीलंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. बांगलादेश संघाने न्यूझीलंडच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला. या दुसऱया कसोटीत बांगलादेशच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत दिवसभरातील 90 षटकांत 349 धावा झोडपताना केवळ एकमेव फलंदाज गमविला. बांगलादेशच्या गोलंदाजांना यश मिळाले नाही.
कर्णधार लॅथम आणि यंग या सलामीच्या जोडीने न्यूझीलंडच्या डावाला दमदार सुरूवात करून देताना 38 षटकांत 148 धावांची भागिदारी केली. बांगलादेशच्या इबादत हुसेनच्या पहिल्या षटकांत लॅथमविरूद्ध दोनवेळा पायचीतचे अपील केले पण पंचांनी ते फेटाळून लावले. उपाहारानंतरच्या पहिल्या षटकांत हुसेनच्या गोलंदाजीवर लिटॉन दासने स्लीपमध्ये यंगला जीवदान दिले. बांगलादेशच्या एस इस्लामने यंगला मोहम्मद नईमकरवी झेलबाद केले. यंगने 114 चेंडूत 5 चौकारांसह 54 धावा जमविल्या.
न्यूझीलंडचा पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार लॅथम आणि कॉनवे या जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. या जोडीने दिवसअखेर दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 201 धावांची भागिदारी केली. लॅथमने 278 चेंडूत 28 चौकारांसह 186 धावा जमविल्या. कॉनवे 148 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 99 धावांवर खेळत आहे. लॅथमची वाटचाल द्विशतकाकडे होत असून कॉनवेला आपल्या शतकासाठी केवळ एका धावेची गरज आहे. न्यूझीलंडतर्फे कसोटीत शतक झळकविणाऱया फलंदाजांच्या यादीत कर्णधार विल्यम्सन 24 शतकांसह पहिल्या स्थानावर असून लॅथम चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत लॅथमची फलंदाजी चांगली झाली नव्हती. त्याने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात 1 तर दुसऱया डावात 14 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव- 90 षटकांत 1 बाद 349 (लॅथम खेळत आहे 186, यंग 54, कॉनवे खेळत आहे. 99, एस इस्लाम 1-50).









