पंतप्रधान मोदींचा सपवर शाब्दिक वार
‘पूर्वी आम्ही घरातून बाहेर पडण्यास घाबरायचो, परंतु आता भाजपच्या शासनकाळात गुन्हेगार थरथर कापत आहेत’ असे उत्तरप्रदेशातील भगिनी अन् मुली खुल्या मनाने म्हणत आहेत. भाजप सरकारच्या काळात गुन्हेगार एक तर तुरुंगात गेले किंवा राज्यातून पळून गेले. काही गुंडांनी तर जामीन रद्द करवून घेत तुरुंगातून बाहेर पडण्यास नकार दिला आहे. कायदा-सुव्यवस्थेतील ही सुधारणा सर्व लोकांमुळे झाली आहे. कारण लोकांनीच योगी आदित्यनाथ आणि भाजपला मत दिले होते असे उद्गार पंतप्रधान मोदींनी व्हर्च्युअल प्रचारसभेत काढले आहेत.
पूर्वी सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना लोकांच्या श्रद्धेशी कुठलेच देणेघेणे नव्हते तसेच जनतेच्या गरजांची त्यांना जाणीव नव्हती. उत्तरप्रदेशची लूट करा हाच एक त्यांचा अजेंडा होता. याच नेत्यांचा आता योगी आणि भाजप सरकारमुळे जळफळाट होत आहे. या नेत्यांनी उत्तरप्रदेशची केलेली स्थिती ही नकली समाजवादी आणि घराणेशाहीचा खरा चेहरा आहे. पूर्वी महामार्गावर वाहने रोखून लूट व्हायची. भर रस्त्यात वाहने रोखून भगिनी-मुलींवर बलात्कार केले जात होते असे म्हणत पंतप्रधानांनी समाजवादी पक्षाला लक्ष्य केले आहे.
मथुरा आणि ब्रजच्या धार्मिक स्थळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहोत. निवडणूक पाहून कृष्णभक्तीचा पेहराव करणारे सरकारमध्ये असताना वृंदावन, बरसाना, गोवर्धन, नंदगाव यासारख्या क्षेत्रांना विसरले होते. उत्तरप्रदेशच्या नकाशात ही क्षेत्रे आहेत हेच त्यांना माहित नव्हते. भाजपसाठी जनसमर्थन पाहून आता लोकांच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्णाची आठवण येते. जे झोपलेले असतात, ते स्वप्ने पाहतात, जे जागे राहतात ते संकल्प घेत असल्याचे मोदी म्हणाले.
यंदाही निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा उत्तरप्रदेशच्या विकासाचा राहणार आहे. मागील 5 वर्षांमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने उत्तरप्रदेशचा विकास केवळ भाजपच करू शकतो हे दाखवून दिले आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली दुहेरी इंजिनचे सरकार आहे. याचमुळे मागील अनेक महिन्यांपासून उत्तरप्रदेशातील लोक भाजपला विजयी करण्याचा निर्धार करून असल्याचे मोदींनी जनचौपालमध्ये बोलताना म्हटले आहे.
उत्तरप्रदेश हे भारताचे हृदय आहे. उत्तरप्रदेशने नेहमीच देशाला दिशा दाखवून दिली आहे. आता पुन्हा एकदा उत्तरप्रदेश देशाला नवा मार्ग दाखवतोय. धन-दौलत, जातीयवाद, सांप्रदायिकता आणि घराणेशाहीच्या बळावर काही लोकांनी कितीही राजकारण केले, तरीही ते जनतेचे प्रेम मिळवू शकत नसल्याचे उत्तरप्रदेशच्या लोकांनी दाखवून दिले आहे. शुद्ध मनाने उत्तरप्रदेशच्या लोकांची सेवा करणाऱयाला जनतेचा आशीर्वाद मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बृजभूमीचा प्रत्येक कण श्रीकृष्ण आणि राधामय आहे. मथुरा, आगरा, बुलंदशहरच्या क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात स्वतःचे बलिदान दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जनचौपालला संबोधित करताना मोदींनी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लतादीदींनी जगात भारताला वेगळी ओळख मिळवून दिली. जगात कुठेही गेला तरीही लतादीदींचे चाहते भेटतील. आता त्या शरीर रुपाने आमच्यासोबत नसल्या तरीही स्वतःच्या स्वरांद्वारे आमच्यासोबत कायम राहणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
घोषणापत्र प्रसिद्धी टळली
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप रविवारी घोषणापत्र जारी करणार नाही. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. पक्ष कार्यालयात भाजप नेत्यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर दिवसभरातील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले.









