दिगंबर कामत, चर्चिल यांना दोषमुक्त करावे की खटला सुरू ठेवावा यावर होणार निर्णय
प्रतिनिधी/पणजी
लुईस बर्जरप्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या विरुद्धचा खटला चालू ठेवायचा की सुनावणी सुरू होण्यापूर्वीच त्यांना दोषमुक्त करायचे हे मुंबई उच्च न्यायालयासमोर दि. 5 एप्रिल 2022 रोजी ठरणार आहे.
जायका या जपानी कंपनीने गोव्यात मलनिस्सारण प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्याचे ठरवले. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ठरवण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे ठरले व निविदा जारी केली. ही निविदा लुईस बर्जर या अमेरिकन कंपनीला मिळाली. या अमेरिकन कंपनीच्या एका बडय़ा अधिकाऱयाला भ्रष्टाचारप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयात दोषी ठरवण्यात आले. तेव्हा त्या अधिकाऱयाने गोव्यातील काही राजकारण्यांना व अधिकाऱयांना 75 लाख रुपयांची लाच दिली होती, अशी बातमी अमेरिकेतील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव, जायकाचे तत्कालीन संचालक आनंद वाचासुंदर यांच्यावर गुन्हा नोंदवून घेतला.
या प्रकरणी ईडीने भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयात आरोपपत्रही सादर केले. सदर आरोपपत्रावरील सुनावणी सुरू होण्यापूर्वीच आपल्याला दोषमुक्त करावे, अशी याचना करून दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांनी सादर केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात येत्या दि. 5 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.








