मिकी पाशेको यांचा आरोप
प्रतिनिधी /मडगाव
तृणमूल काँग्रेसला गोव्यात आणून लुईझिन फालेरो हे पुन्हा एकदा गोव्यात भाजपचे सरकार मागच्या दरवाज्यातून सत्तेवर आणू पहात असल्याचा जोरदार आरोप माजी आमदार मिकी पाशेको यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. लुईझिन फालेरो हे सद्या गोव्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी हा प्रकार बंद करावा असा इशारा सुद्धा मिकी पाशेको यांनी दिला आहे.
देशात पाच ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यात गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि दोन उत्तर-पूर्व राज्यांचा समावेश आहे. या पाच ठिकाणापैकी केवळ तृणमूल काँग्रेसने गोव्यातच प्रवेश केलेला आहे. तृणमूल काँग्रेसचा गोव्यातील प्रवेश म्हणजे रोहिंग्याना आमंत्रण आहे. रोहिंग्या हे अत्यंत धोकादायक असून गोवेकरांनी आत्तापासूनच तृणमूल काँग्रेस पासून सावध रहावे असे आवाहन त्यांनी केले.
लुईझिन फालेरो यांना आत्ताच कंठ का फुटला ?
लुईझिन फालेरो यांनी काँगेस पक्ष सोडल्यानतंरच ते बोलू लागले आहेत. काँग्रेस मध्ये असताना त्यांनी मौनव्रत का पाळले होते असा सवाल मिकी पाशेको यांनी उपस्थितीत केला आहे. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर पक्षात अन्याय होत असल्यास तिथे का बोलणी केली नाही ? आत्ता आपले गैरव्यवहार उघडे होतील म्हणून काँग्रेस सोडली का ? आत्ता ते बोलू लागले आहेत. त्याला काहीच महत्व नसल्याचे मिकी पाशेको म्हणाले.
भाजपमधील एकच आमदार आणून दाखवावा लुईझिन फालेरो सद्या इतर पक्षातील आमदार गळाला लागतील का ? यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना धमक असल्यास त्यांनी भाजपचा एकच आमदार आपल्या सोबत आणून दाखवावा असे आवाहन मिकी पाशेको यांनी दिले आहे.









