28 दिवसांपूर्वी करण्यात आले होते अपहरण
वृत्तसंस्था / त्रिपोली
लीबियात 28 दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या 7 भारतीय कामगारांची मुक्तता करविण्यास यश आले आहे. टय़ुनीशियातील भारतीय राजदूत पुनीत रॉय कुंदल यांनी याची माहिती दिली आहे. मुक्तता करविण्यात आलेले 7 जण कामगार असून आंध्रप्रदेश, बिहार आणि गुजरातचे रहिवासी आहेत. अपहरणकर्त्यांनी 14 सप्टेंबर रोजी लीबियाच्या अस्वेरिफ भागातून त्यांचे अपहरण केले होते.
लीबियात दूतावास नसल्याने या भारतीयांच्या मुक्ततेची जबाबदारी टय़ुनीशियातील भारतीय दूतावासाकडे देण्यात आली होती. टय़ुनीशियातील भारतीय दूतावासाने लीबियाचे सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीने त्यांची मुक्तता करविली आहे.
सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्या कंपनीशी अपहरणकर्त्यांनी संपर्क साधला होता. कर्मचारी अपहृत झाले असून सुरक्षितपणे ताब्यात असल्याचा विश्वास देण्यासाठी अपहरणकर्त्यांनी त्यांची छायाचित्रे दाखविली होती. भारतीयांच्या मुक्ततेसाठी अपहरणकर्त्यांनी खंडणीची मागणी केली होती. यानंतर संबंधितांच्या कुटुंबीयांनी केंद्र सरकारला मुक्तता करविण्याची विनंती केली होती अशी माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली होती.
वेल्डरचे काम
हे कामगार लीबियाच्या एनडी इंटरप्रायजेस कंपनीत आयर्न वेल्डर म्हणून काम करत होते. 14 सप्टेंबर रोजी ते भारतात परतण्यासाठी त्रिपोली विमानतळाकरता निघाले होते. कंपनीच्या कार्यालयाकडून विमानतळापर्यंतच्या मार्गात त्यांचे अपहरण करण्यात आले होते.
लीबियात जाण्यास मज्जाव
सप्टेंबर 2015 मध्ये भारत सरकारने लीबियाच्या प्रवासाविषयी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. सुरक्षा स्थिती पाहता लीबियाला न जाण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला होता. मे 2016 मध्ये लीबियातील बिघडत चाललेली स्थिती पाहता भारतीयांच्या तेथील प्रवासावर सरकारने पूर्णपणे बंदी घातली होती. ही बंदी अद्याप कायम आहे.