प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा फुले रोडवर डेनेज वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाले तरी नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्याची दुरुस्ती करून वाहनचालकांना ये-जा करण्यासाठी खुला करण्यात आला नाही. वाहनचालकांना आणि व्यावसायिकांना मागील दोन वर्षांपासून डोकेदुखीचे बनले आहे. यामुळे रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता खुला करण्याची मागणी होत आहे.
शहरात अमृत योजनेअंतर्गत डेनेज वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याअंतर्गत शहापूर, हुलबत्ते कॉलनी आणि जुना महात्मा फुले रोडवर डेनेज वाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जुना महात्मा फुले रोडवरील डेनेज वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे.
दोन वर्षांपासून काम रखडले
या रस्त्याचे रुंदीकरण करून विकास करण्यात येणार असल्याचे सांगून मागील वषीपासून रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून येथील रहिवाशांना चिखलाच्या साम्राज्यात ये-जा करावी लागत आहे. यंदा पावसाळय़ापूर्वी रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. पण येथील गटार बांधकामाबाबत तक्रारी झाल्याने काम अर्धवट स्थितीत आहे. यामुळे जुना महात्मा रोड खराब झाला असल्याने रहिवाशांचा रस्ता बंद झाला आहे.
वाहने येत नसल्याने व्यवसाय बंद
त्याचप्रमाणे परिसरात दुचाकी व चारचाकी वाहने ये-जा करण्यासदेखील अडचण बनली आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. रस्त्यामुळे वृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांना घरातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. वाहने येत नसल्याने व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. ग्राहकांना साहित्य नेण्यास अडचण होत असल्याने ग्राहकांनी व्यवसायाकडे पाठ फिरविली आहे. रस्त्यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.
परिसरात मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण झाल्या असून सांडपाण्याचा निचरादेखील व्यवस्थित होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धुळीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.









